। चेन्नई । वृत्तसंस्था ।
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन होत आहे. तो सध्या तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या बुची बाबू या आमंत्रितांच्या स्पर्धेत झारखंड संघाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत त्याने मध्य प्रदेशविरुद्ध शतकी खेळी केली आहे.
या सामन्यात मध्यप्रदेशने पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना 91.3 षटकात सर्वाबाद 225 धावा केल्या होत्या. यात शुभम खुशवाहने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. तर, अरहम अकिलने 57 धावांची खेळी केली. झारखंडकडून शुभम सिंग आणि सौरभ शेखर यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. तसेच, विवेकानंद तिवारी आणि आदित्य सिंग यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
मध्यप्रदेशच्या 225 धावांचा पाठलाग करताना झारखंड मधुन खेळणार इशान किशन 6 व्या क्रमांकावर उतरला होता. यावेळी त्याने आक्रमक खेळी करताना शतक ठोकले आहे. यासह त्याने तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचेही दाखवून दिले आहे. त्याने 107 चेंडूत 114 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 10 षटकार मारले आहेत. त्याने 61 चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. यानंतर तो आणखी आक्रमक खेळताना दिसला. यामुळे झारखंडने या सामन्यात आघाडी घेतली आहे.