औद्योगिक सांडपाण्याने जलजीवनाचा ऱ्हास, प्रशासन निष्क्रिय?
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
तळोजा औद्योगिक परिसरातून वाहणारी कासाडी नदी पुन्हा एकदा गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, नदीचे पाणी काळ्या रंगात बदलल्याने पर्यावरणीय धोक्याची घंटा वाजली आहे. मध्यभागातून पश्चिमेकडे वाहणाऱ्या या नदीत सातत्याने औद्योगिक सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नदीतील पाण्याचा रंग गडद काळा झाल्यामुळे प्राणवायूची पातळी झपाट्याने घसरली असून, त्यामुळे मासे व इतर जलचर प्रजाती जवळपास नामशेष झाल्याचे चित्र आहे. काही भागात असह्य दुर्गंधी पसरल्याने परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “प्रदूषण हा आता नित्यक्रमच झाला आहे. तक्रारी करूनही केवळ औपचारिक पाहणी केली जाते, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सतीश पडवळ यांनी घटनेची दखल घेतली असून, “नमुने तपासून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे सांगितले आहे. मात्र, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कासाडी नदीचे अस्तित्वच धोक्यात आले असून, पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून तातडीने ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची जोरदार मागणी होत आहे.
