कशेडी घाट पावसाळ्यात होतोय अपघातप्रवण क्षेत्र

तांत्रिक बिघाडामुळे आठवड्यात दोन वाहनांचे नुकसान
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरनजीक कशेडी घाटामध्ये चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्णत्वास जात आहे. पावसाळ्यामुळे अवजड वाहनांना वेगनियंत्रण करताना अपघात होत असून, वाहनांमध्ये तांत्रिक दोष निर्माण होत असल्याचेही दिसून आले आले आहे. गेल्या आठवडाभरात चोळई आणि भोगाव येथे दोन वाहनांचे नुकसान झाल्याने कशेडी घाट पावसाळ्यामध्ये अपघातप्रवण क्षेत्र होत असल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील चोळई येथे कशेडी घाटाच्या प्रारंभी सुंदरराव मोरे महाविद्यालयासमोर सायंकाळच्या दि. 15 जून रोजी सुमारास खेडकडून मुंबईकडे जाणारा एक कंटेनर (क्र.एमएच 46 एएफ 2947) महामार्गाच्या एका बाजूला येऊन कलंडला. तर, दि. 20 जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कशेडी घाट उतरताना भोगाव या गावाच्या हद्दीमध्ये दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंटेनरच्या ड्रायव्हर केबिनमधील वायरिंगमध्ये बिघाड झाला तसेच पुढील बाजूच्या टायर्ससह केबिननेही पेट घेतल्याने झालेल्या अपघातात या कन्टेनरचे प्रचंड नुकसान झाले.
कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असलेल्या भोगाव ते खवटीपर्यंतच्या बोगद्याचे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात असताना या भुयारी मार्गापर्यंतचा अ‍ॅप्रोच रोड आणि अ‍ॅप्रोचरोडवरील पुलांचे काम युध्दपातळीवर सुरू असूनही हे दोन अपघात झालेले ठिकाण घाटाचा उतार असलेल्या भुयाराकडे जाणार्‍या रस्त्याच्या अलीकडे असल्याने या अपघातप्रवण क्षेत्राचा तीव्र उतार भविष्यात वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवून अपघाताला निमंत्रण देणारा ठरणार आहे.

Exit mobile version