अनेक सुविधांपासून वंचित
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय अनेक सुविधांपासून आजही वंचित आहे. 30 वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या ग्रामीण रुग्णालयात पूर्ण क्षमतेने बेडदेखील उपलबध नाहीत आणि रुग्णालय सुरु झाल्यापासून अद्याप वैद्यकीय अधीक्षक या रुग्णालयाला मिळाले नाही.कर्जत तालुक्यातील अर्ध्या आदिवासी भागातील जनतेचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कशेळे गावाची ओळख आहे. आदिवासी भाग लक्षात घेऊन शासनाने या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कशेळे गावातील चार ग्रामस्थांनी 24 गुंठे जमीन शासनाला देऊ केली आणि 1974 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाले. रुग्णांची गर्दी लक्षात घेऊन ग्रामीण भागातील रुग्णांचा आधार लक्षात घेऊन या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर 1986 मध्ये ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. शासनाने त्यावेळी घोषित केलेले 30 बेड चे ग्रामीण रुग्णालय आजही कागदावरच आहे असे म्हणावे लागेल. कारण ग्रामीण रुग्णालय 30 बेडचे म्हणून सुरु करण्यात आले, पण 35 वर्षे हे रुग्णालय 20 बेडचे रुग्णांना म्हणूनच सुरु आहे.
कारण, इमारती बांधण्यात आली त्यावेळी 20 बेडचे रुग्णालय सुरु झाले, ते आजही 20 बेडचेच असून, 10 बेड लावायला जागा शासन आजतागात उपलब्ध करून देऊ शकले नाही. त्यात ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती झाली त्यावेळी हे रुग्णालयात चार एमबीबीएस दर्जाचे डॉक्टर आणि मेडिकल सर्जन दर्जाचा वैद्यकीय अधीक्षक अशा पोस्ट मंजूर होत्या. मात्र, आजतागात या ग्रामीण रुग्णालयाला मेडिकल सर्जन दर्जाचा वैद्यकीय अधीक्षक मिळाला नाही, ही शोकांकिता असून, वैद्यकीय अधिकारी दर्जाचे डॉक्टर यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक यांची प्रभारी जबाबदारी रुग्णालय सुरु झाले तेव्हापासून आहे ती आजही कायम आहे. त्यात आजदेखील दोनपेक्षा अधिक एमबीबीएस दर्जाचे डॉक्टर यांच्यापुढे या रुग्णालय वैद्यकीय अधिकारी आले नाहीत. त्यामुळे 20 बेडच्या रुग्णालयाचा भार दोन वैद्यकीय अधिकारी वाहत आहेत.
रुग्णालयासाठी शासनाच्या दोन रुग्णवाहिका मंजूर असून, त्यापैकी एक रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत अनेक वर्षे गोडाऊनमध्ये पडून आहेत. तर शासनाने गतवर्षी कोविड काळात कशेळे ग्रामीण रुग्णालयासाठी एक रुग्णवाहिका दिली आहे, पण त्या रुग्णवाहिकेची चालक दिला नाही. त्यामुळे चालकाविना रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात धूळ खात पडून आहे. 50 हुन अधिक गावे आणि तितकीच आदिवासी पांडे यांचे आरोग्य ज्या ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे, त्या कशेळे ग्रामीण रुग्णालयामध्ये स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने गरोदर महिला प्रसूतीसाठी आल्यानंतर तेथे सीझर करण्याची वेळ आली तर भूलतज्ज्ञदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे नैसर्गिक प्रसूती वगळता अन्य प्रकारच्या प्रसूती या रुग्णालयात होत नाहीत. त्यामुळे नैसर्गिक प्रसूती होणार नसलेल्या गरोदर मातांना पुढे कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवले जाते आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयातदेखील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने आदिवासी भागातील गरोदर मतांची हेळसांड होते. आणि मग या गरोदर महिलांना खासगी रुग्णालयात नाईलाज म्हणून जावे लागते, अशी सिस्टीम कर्जत तालुक्यातील रुग्णालयांची बनली आहे.
कशेळे ग्रामीण रुग्णालयात जे दोन डॉक्टर सेवा देत आहेत, त्यातील एक डॉक्टर हे हाडांचे तर दुसरे बालरोग तज्ज्ञ आहेत. हाडांचे डॉक्टर असलेले डॉ. विक्रांत खंदाडे यांच्यावर वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी असून, त्यांच्याकडून नियमितपणे शस्त्रक्रिया सुरु असतात, ही या रुग्णालयाची काहीशी जमेची बाजू आहे. या रुग्णालयात ना आयसीयू आणि ना अतिदक्षता विभाग, मात्र आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी दोन वॉर्डमध्ये प्रत्येकी पाच-पाच बेड हे ऑक्सिजन बेड म्हणून तयार ठेवले आहेत. पण, त्या ठिकाणी अतिदक्षता रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने ऑक्सिजन लावण्याची वेळ रुग्णालयात येत नाही. त्यामुळे 10 ऑक्सिजन बेड ही सुविधादेखील बिनकामाची ठरत आहे. आदिवासी तालुका असलेल्या कर्जत तालुक्यासाठी आणि आदिवासी भागात सुरु झालेले कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय शासनाच्या दृष्टीने दुर्लक्षित रुग्णालय सुरु झाल्यापासून 20 बेड क्षमतेचे सुरु असून, उर्वरित 10 बेड लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही. अशा अनेक समस्यांचा सुकाळ आहे.