| अलिबाग | प्रतिनिधी |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपात हा सण साजरा केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोहळ्याचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात विविध कार्यक्रम, रॅलीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
जे.एस.एम. महाविद्यालयात समता सप्ताह साजरा
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या 199 व्या आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीदिनानिमित्त 11 ते दि. 14 एप्रिल दरम्यान जे. एस. एम. महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी (दि.14) एप्रिल रोजी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महात्मा जोतिबा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यामध्ये विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक समता सप्ताहमध्ये विद्यार्थ्यांसाठी यावेळी अभ्यासपर्व उपक्रमाचे आयोजन ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत करण्यात आले होते. महाविद्यालयातील 45 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून दररोज 8 तास वाचनाने महामानवास अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे मानवमुक्तीचे कार्य या विषयावर महाविद्यालयात निबंधलेखन स्पर्धेचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, प्र. प्राचार्य डॉ. नीलम हजारे विधी महाविद्यालय, उप प्राचार्य डॉ. प्रवीण गायकवाड, अजय सावंत तसेच अन्य प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खोपोलीत डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा जागर
जग युध्दाची भाषा करत युद्धाचे रणशिंग फुंकत असताना खोपोली नगरपालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त व्याख्याने आयोजित करून बुद्धांची भाषा बोलतोय असे गौरवउद्गार प्रख्यात लेखक, संजय आवटे व्याख्यान करताना काढले आहे. या व्याख्यानातून संविधानातील मूल्यांची जाणीव आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा नव्याने अधोरेखित झाली.

यावेळी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करताना, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा शोध लावून शिवचरित्र समाजासमोर आणले, याची विशेष आठवण करण्यात आली. स्त्री शिक्षणाची क्रांती, जातीभेदाविरुद्धचा संघर्ष आणि सत्यशोधक समाज स्थापनेद्वारे समता व बंधुतेचा विचार रुजवण्यातील त्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, अनिल सानप, सुवर्णा मोरे, अमित फाळे, संदीप पाटील, विनायक तेलवणे, सुनिल पाटील, स्वेला अहिर, विनिता कांबळे, हर्षदा गायकवाड, अश्विनी अत्रे, सुमती कोळंबे, उल्हाराव देशमुख, यशवंत गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चवदार तळ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्सव साजरा होणार आहे या निमित्ताने चवदार तळ्यावर हजारोच्या संख्येने भीम अनुयायी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत या जयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला महाडमधील चवदार तळ्यावर चोहू बाजूने विविध रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली.

रात्री 12 वाजून दहा मिनिटांनी जयंती उत्सव समिती व तालुक्यातील सर्व संघटना एकत्रित येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते विविध संघटना व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उरण महाविद्यालयात विद्यर्थ्यांना मार्गदर्शन
ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला, महिलांना त्याचे स्वातंत्र्य व अधिकार मिळाले, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला अशा महान थोर समाज सुधारक, भारतीय घटनेचे शिल्पकार, कायदेतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उरण महाविद्यालयात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी डॉ. एच. के.जगताप, डॉ. एम. जी. लोणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए.के गायकवाड यांनी केले प्राचार्य डॉ.वाल्मिक गर्जे यांनी मा . फुले, छ. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार अंगीकरण्याची आवश्यकता आहे असा उपदेश उपस्थितांना दिला. तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली. डॉ जगताप यांनी डॉ आंबेडकर यांचे कृषी व आर्थिक धोरण विषद केले. डॉ लोणे यांनी डॉ. आंबेडकर यांची पत्रकारिता या विषयी आपले विचार मांडले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्ता हिंगमिरे आणि आभार प्रदर्शन डॉ. ए.आर. कांबळे यांनी केले. आदर्श महापुरुषांचा वारसा व त्यांचे आदर्श गुण अंगीकरण्या बाबत या कार्यक्रमातून आवाहन करण्यात आले. जयंती निमित्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीही मोठया प्रमाणात उपस्थित होते.
रेवदंडा पंचशील नगरात भव्य मिरवणूक
रेवदंडा येथील पंचशील नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने पंचशील नगर ग्रामस्थांच्या वतीने भव्य सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा स्थापित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी रेवदंडा पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पंचशील नगर ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच, विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. सायंकाळी पंचशील नगर ते रेवदंडा बाजारपेठ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थ, महिला व युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन गायकवाड, मधुकर गायकवाड, सचिन पवार, सतीश पवार, ऋतिक पवार, गौरव गायकवाड, अमोल गायकवाड, जीवन जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.
मुरुडमध्ये ग्रंथ प्रदर्शन
मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात समता सप्ताह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथाचे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या विकास समिती सदस्या वासंती उमरोटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल विचार मांडले तर प्राचार्य डॉ. जे. के. कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र कथन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.प्राध्यापक डॉ. एस. एल. म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
डिकसळ येथील शांतीनगरमध्ये व्याख्यान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील शांतीनगर येथे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवी मुंबई येथील आगरी कोळी कराडी युथ फाऊंडेशन सीए निलेश पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी निलेश पाटील यांनी सर्वांनी विपश्यना कोर्स करण्याचे आवाहन केले. सुरुवातीला सी ए निलेश पाटील यांचा शांतिदूत मंडळाचे वतीने अध्यक्ष नितीन पाटील यांचा सत्कार शांतिदूत मंडळाचे अध्यक्ष नितीन गायकवाड उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, कार्याध्यक्ष प्रमोद वाघमारे यांचे हस्ते करण्यात आला तर सायकलपटू हिरेन हिसालके यांचा सत्कार रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्ष अर्चना गायकवाड, भारती भोईर, हिराबाई हिरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, उपाध्यक्ष शिवाजी कराळे, मनोहर हजारे, संदीप म्हसकर,अंकुश शेळके, मिलिंद विरले, दामत, किशोर घारे, सुभाष नाईक, सचिन गायकर, पंकज बुंधाटे, राम हिसालके, ॲड. विपुल हिसालके, ॲड. ठोंबरे, किशोर गायकवाड, मदन हिरे, समीर गायकवाड, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. उत्तम गायकवाड यांनी केले.
तंत्रनिकेतनमध्ये बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा
कोलाड गोवे येथील गीता. द. तटकरे तंत्रनिकेतन, व आयटीआय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त संदीप तटकरे, रजिस्टार अजित तेलंगे, संस्थेचे प्राचार्य, विपुल मसाल, प्राचार्य संजय हजारे, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कॉलेजच्या वतीने बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. संविधान निर्मितीत दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल माहिती देण्यात आली.
पनवेलमध्ये लोकसहभागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.

पनवेलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी कलाकार नवीन मोरे यांनी आकर्षक रांगोळी साकारली आहे.











