| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील विघवली केंद्राने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून विघवली केंद्रातील शाळांसाठी बाल मेळावा आयोजित केला होता. या बाल मेळाव्यात रायगड जिल्हा परिषद कशेणे शाळेने उज्ज्वल यश संपादन केले.
या बालमेळाव्याच्या अनुषंगाने पारंपरिक लोकनृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा यांचे आयोजन केले होते. यामध्ये केंद्रातील तेरा शाळा सहभागी झाल्या होत्या. छोटा गट इयत्ता पहिली ते चौथी व मोठा गट इयत्ता पाचवी ते सातवी अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा कशेणेच्या जोगवा या नृत्याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला तसेच, वक्तृत्व स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर शाळेतील इयत्ता चौथीतील कुमारी आर्या विशाल शिर्के हिने मांडलेल्या विचारांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला, तर निबंध स्पर्धेमध्ये श्रेयश गणेश मुंडे इयत्ता तिसरी या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकाविला. अशा प्रकारे तेरा शाळांमधून तीनही स्पर्धांमध्ये कशेणे शाळेला यश मिळाले आहे. यासाठी या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा जंगम मॅडम व सहशिक्षिका दिप्ती ढेपे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तसेच, पारंपारिक लोकनृत्याच्या तयारीसाठी शालेय व्यवस्थापन समिती व संपूर्ण पालकवर्गांचे सहकार्य लाभले त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.