। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील माणकिवली गावाजवळ कस्तुरी लॉजिस्टिक्सच्या वेअरहाऊसचे बांधकाम सुरू असताना मंगळवारी (दि.13) सकाळी लोखंडी शेड कोसळून भीषण दुर्घटना घडली. या घटनेत 25 कामगार जखमी झाले असून, एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
माणकिवलीजवळ सुमारे 40 एकर परिसरात वेअरहाऊस उभारणीचे काम सुरू होते. सकाळी दहाच्या सुमारास अचानक शेडचा लोखंडी सांगाडा कोसळला. त्यामुळे कामाच्या ठिकाणी एकच धावपळ उडाली. काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, तर अनेक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करून जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत चौकशीची गरज
शेड कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, एवढ्या मोठ्या बांधकामादरम्यान लोखंडी सांगाड्याची रचना, वापरण्यात आलेले साहित्य आणि उभारणीच्या कामाची गुणवत्ता याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचीही तपासणी होणे गरजेचे आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळाची तांत्रिक पाहणी करून सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. मृत कामगाराच्या कुटुंबीयांना तसेच जखमी कामगारांना नियमानुसार मदत मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.







