खारेपाटचा बालेकिल्ला शाबूत ठेवा : गौतम पाटील

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

आंबेपूर मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची ताकद अजूनही तितकीच भक्कम असून, खारेपाटचा बालेकिल्ला कोणाच्याही अपप्रचाराने डळमळीत होणार नाही, असा ठाम विश्वास शेकापचे जिल्हा सहचिटणीस गौतम पाटील यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने पक्षाचा मतदार आजही लाल बावटा हातात घेऊन पक्षाच्या मागे ठामपणे उभा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भाई जयंत पाटील यांच्या सुपीक डोक्यातून या मतदारसंघात एक सर्वसामान्य वकील मुलगी उमेदवार म्हणून दिली गेली, हे पक्षाच्या विचारांचे उदाहरण असल्याचे सांगत पाटील म्हणाले, हा मतदारसंघ कोणाची खासगी मक्तेदारी नाही. हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा होता, आहे आणि कायम राहील. ते पुढे म्हणाले की, भाई, तुमच्या महालाची एकही वीट हललेली नाही. भिंती अजूनही मजबूत आहेत. कितीही अपप्रचार झाला तरी पक्षाचा मतदार विचलित झालेला नाही, हे आज उपस्थित असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे, असे त्यांनी सांगितले. सात तारखेला मतपेटीत ही ताकद दिसून येईल आणि आंबेपूर मतदारसंघातील दोन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि पाटील कुटुंबियांच्या चौथ्या पिढीच्या प्रेमामुळे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून, ती सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच झाल्याचे त्यांनी ठासून सांगितले. जिल्हा परिषदेचा निधी, भाई जयंत पाटील यांचा आमदार निधी, तसेच मीनाक्षीताईंच्या आमदार निधीतून झालेली सर्व कामे ही पक्षाची देणगी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नाव न घेता विरोधकांवर टीका करत त्यांनी म्हटले, तुम्हाला उमेदवारी दिली, कारण तुम्ही पक्षाचे नेते होतात. तुम्ही पक्ष सोडून गेलात म्हणून पक्षाचा मतदार हलत नाही, हे आज जमलेल्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. खारेपाट विभाग हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असून, पक्षाने सक्षम उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांवर प्रेम दाखवत मोठ्या संख्येने मतदान करून बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

मतदारच संधीचे सोने करणार : पूजा भगत

शेकापने ही उमेदवारी सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलीला दिली आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, सुप्रिया पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आणि ॲड. गौतम पाटील यांनी ठेवलेला विश्वास कार्यकर्त्यांच्या भरोवशावर सार्थक करून दाखवीन. या मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी सर्वांनी कामाला लागा. एक-एक मत महत्त्वाचे आहे. आजच्या या सभेत जमलेली जनता हाच माझा विजय आहे, असा विश्वास आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार पूजा भगत यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.

विरोधक मतदारांची दिशाभूल करताहेत : छाया पिंगळे

महाविकास आघाडीमार्फत ही निवडणूक लढविली जात आहे.प्रचार सभेत भव्य दिव्य स्वरुपात जमलेले कार्यकर्ते हीच खरी विजयाची नांदी आहे. या मतदार संघातील विरोधकांचे उमेदवार विकास कामे केल्याची जाहिराती करीत आहेत. परंतु, कोणत्या गावाचा विकास केला हे दाखवून द्या, असा टोला भाजपच्या उमेदवारांना नाव न घेता लगावला. तसेच विरोधकांचे दुसरे उमेदवार गावांतील अंधार दूर केला, अशी जाहिरात करीत आहेत. मात्र, कोणत्या गावाचा अंधार दूर केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चुकीच्या जाहिराती करून मतदारांची दिशाभूल करण्याचे काम विरोधक करीत आहेत, असा टोला रसिका केणी यांना लागवला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार पूजा भगत यांना भरघोस मतांनी मतदार निवडून देतील, असा विश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या छाया पिंगळे यांनी व्यक्त केला.

भरघोस मतांनी निवडून द्या : सुनील पाटील

मागील निवडणुकीप्रमाणे ही निवडणूकदेखील शेतकरी कामगार पक्षासोबत काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढत आहे. या निवडणुकीत जिंकण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करायचे आहे. खटारा या चिन्हासमोरील बटण दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन काँग्रेसचे नेते सुनील पाटील यांनी केले. सध्याचे राजकारण पाहता देशाचे संविधान तसेच लोकशाही टिकविण्यासाठी विरोधकांच्या कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version