। पनवेल । वार्ताहर ।
मध्य प्रदेश राज्यातून फुस लावून घणसोली येथे पळवून आणलेल्या 13 वर्षीय मुलीची युवा चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी रबाळे पोलिसांच्या मदतीने सुटका केल्याची घटना घडली. त्यानंतर चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी सदर मुलीला व तिला पळवून आणणार्या तरुणाला मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेतील 13 वर्षीय पिडीत मुलगी व तीला फुस लावून पळवून आणणारा आरोपी दिपक (24) हे दोघेही मध्य प्रदेश राज्यातील आहेत. गत जून महिन्यात आरोपी दिपक याने पिडीत मुलीला फुस लावून नवी मुंबईत घणसोली येथे आणून ठेवले होते. याबाबत मध्यप्रदेश पोलिसांनी 13 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तीला पळवून नेणार्या आरोपीचा शोध सुरु केला होता. या शोध मोहीमेदरम्यान, आरोपीने पिडीत मुलीला घणसोलीत आणल्याची माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे गत महिन्यामध्ये मध्य प्रदेश पोलिसांनी घणसोलीत येऊन आरोपी व पिडीत मुलीचा शोध घेतला होता, मात्र त्यावेळी त्यांना कुणीच सापडले नव्हते. दरम्यान, आरोपी दिपक, पिडीत मुलीसोबत रहात असलेल्या ठिकाणाची पक्की माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी युवा चाईल्ड लाईन संस्थेला संपर्क साधुन पिडीत मुलीची सुटका करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार युवा चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक विजय खरात व त्यांच्या सहकार्यांनी रबाळे पोलिसांच्या मदतीने आरोपी दिपक रहात असलेल्या घराचा ठाव ठिकाणा शोधुन दिपकला पिडीत मुलीसह ताब्यात घेतले. याबाबतची माहिती मध्य प्रदेश पोलिसांना दिल्यानंतर नवी मुंबईत दाखल झालेल्या मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात पीडित मुलीला व तीला पळवून असणार्या आरोपीला देण्यात आले.