| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केरळ हा मिनी पाकिस्तान आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांची बहीण (प्रियांका गांधी) तिथून निवडणूक जिंकत आहेत. सर्व अतिरेकी त्यांना मतदान करतात. अतिरेक्यांच्या मतांमुळेच ते खासदार झाले आहेत, असे आक्षेपार्ह वक्तव्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. सोमवारी पुणे जिल्ह्यातील सासवड येथे ते बोलत होते.
नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचे सरकार आहे. जो कायदा अन्य धर्मियांना लागतो, तोच कायदा हिंदू धर्माला लागतो. कायद्याच्या चौकटीत सर्व कामे हेच आम्हाला अपेक्षित आहे. अफजल खान वधाचा पोस्टर तुम्ही लावू नका, यातून भावना दुखवतील, असे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु, ज्या देशात 85 टक्के हिंदू राहतात, आमच्या नसानसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराष्ट्रात आम्ही अफजलखानाच्या वधाचे पोस्टर लावायचे नाहीत? मग पाकिस्तानमध्ये लावायचे का, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.
नितेश राणे यांच्या मिनी पाकिस्तान या वादग्रस्त विधानानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर राणे यांनी केरळ हा भारताचाच भाग असल्याचे म्हणत घुमजाव केले. मी फक्त केरळ आणि पाकिस्तानमधील परिस्थितीची तुलना करत होतो. आमचा देश, जो हिंदु राष्ट्र आहे, ते हिंदु राष्ट्रच राहावे, अशी आमची इच्छा आहे. हिंदूंचे सर्व प्रकारे संरक्षण केले पाहिजे. केरळ हा भारताचाच भाग आहे. तथापि, हिंदूंची घटती लोकसंख्या ही प्रत्येकाने काळजी करायला हवी. हिंदूंचे मुस्लिम आणि ख्रिश्चनमध्ये धर्मांतर करणे ही तिथली रोजची गोष्ट बनली आहे. लव्ह जिहादची प्रकरणे घडत असून, हिंदू महिलांना टार्गेट केले जात आहे. तेच मी माझ्या भाषणात सांगण्याचा प्रयत्न करत होतो, असे राणे म्हणाले.







