11 ठिकाणी 150 सीसीटीव्ही कॅमेरे; सुरक्षेच्या दृष्टीने रायगड पोलीस अलर्ट
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
मुंबई येथील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर रायगड पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील लँडिंग व बंदरांवर सीसीटीव्ही कॅमेर्यामार्फत नजर ठेवण्याचे काम करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अलिबाग समुद्रकिनार्यासह अन्य 11 ठिकाणी 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. थर्टी फर्स्ट साजरा करत असताना बंदरांवर तिसर्या डोळ्याची नजर राहणार आहे.
रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत असताना औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने जिल्ह्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक प्रकल्प आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांतील कच्चा व पक्का माल जिल्ह्यातील वेगवेगळ्या बंदरांवर उतरविला जातो. जिल्ह्यात रस्ते वाहतुकीबरोबरच जलवाहतुकीवरदेखील भर दिला जात आहे. मांडवा बंदर व रेवस बंदर जलवाहतुकीसाठी विकसित झाले आहे. मुंबई येथील गेट-वे, भाऊचा धक्का येथून सागरी मार्गाने लाखोंच्या संख्येने पर्यटक अलिबाग, काशीद, मुरूड, नागाव, रेवदंडा, किहीम आदी समुद्रकिनारी फिरण्यास येतात. मुंबईमध्ये 26 नोव्हेंबरला झालेला दहशतवादी हल्ला हा सागरी मार्गाने येऊनच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील शेखाडी खाडीमध्ये आरडीएक्सचा साठा सापडला होता. या घटनेनंतर सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबरोबरच तपासणीवर अधिक भर देण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मांडवा सागरी, मुरूड, वडखळ, श्रीवर्धन, दिघी सागरी, पोयनाड, रोहा व रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लँडिंग पॉईंट व बंदरांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. अलिबाग समुद्रकिनारा वरसोली समुद्रकिनारा, रेवस बंदर, रेवस पकटी, मांडवा बंदर, आगरदांडा प्रवासी वाहतूक जंगल जेट्टी, राजपूरी, धरमतर जेट्टी, धरमतर पोर्ट, बागमांडला जेट्टी, दिघी प्रवासी जेट्टी, दिघी पोर्ट, सानेगाव जेट्टी, पीएनपी जेट्टी, सानेगाव जेट्टी, जेएसडब्ल्यू जेट्टी अशा 11 ठिकाणी दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. स्थानिक व पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे कॅमेरे लावण्यात आले आहेत. सागरी किनारी रात्रीच्यावेळी संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम सीसीटीव्ही कॅमेरे करीत आहेत. या सीसीटीव्ही कॅमेर्यांपासून सागरी सुरक्षा भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आजही जिल्ह्यातील काही बंदरांवरून डिझेलतस्करी मध्यरात्रीच्या सुमारात होत आहे. डिझेलमाफियांविरोधात कारवाई करूनदेखील ही तस्करी केली जात आहे. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.
जिल्ह्यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक दाखल झाले आहेत. किनार्यांसह वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे संशयित हालचालींवर लक्ष ठेवला जाणार आहे. त्यामुळे गैरप्रकार करणार्यांवर तिसर्या डोळ्याची नजर असणार आहे.
दोन ठिकाणी कॅमेरे बंद
रायगड पोलीस दलातील 11 ठिकाणी दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यापैकी दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघी पोर्ट व अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरसोली समुद्रकिनारी प्रत्येकी एक असे दोन कॅमेरे बंद असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून देण्यात आली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना विचारणा केली असता, तेदेखील या घटनेबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर येत आहे.
सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जेट्टी व पोर्ट या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी कॅमेरे बंद आहेत, ते कॅमेरे सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला तातडीने देऊन पर्यटक व सागरी सुरक्षेवर भर दिला जाईल.
हनुमंत शिंदे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, दिघी सागरी पोलीस ठाणे
रायगडला थर्टी फर्स्टची झिंग
सरत्या 2024 या वर्षाला निरोप देत असताना नव्या 2025 वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक, हॉटेल व्यावसायिक सज्ज झाले आहेत. वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. काहीजण मित्रमंडळी व काहींनी त्यांच्या नातेवाईकांसोबत पार्टीचे बेत केले आहेत. यावर्षी थर्टी फर्स्ट म्हणजे 31 डिसेंबर मंगळवारी आला आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा मांसाहाराला 50 टक्केच मागणी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही मोजक्याच मंडळींकडून मांसाहार खरेदी होण्याची शक्यता आहे, असे मटण विक्रेते महेंद्र नखाते यांनी सांगितले.