पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड

शहर सोडून गावातच उभारला उद्योग; केतन चव्हाणांचा प्रेरणादायी निर्णय

| पाली | प्रतिनिधी |

सध्याच्या काळात उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील तरुण शहरांकडे धाव घेत आहेत. असे असताना रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वाफेघर गावातील युवा उद्योजक केतन चव्हाण यांनी मात्र एक वेगळा आणि धाडसी मार्ग निवडला आहे. शहरातील धावपळीचे आणि सिमेंटच्या जंगलातील जीवन सोडून त्यांनी आपल्या मूळ गावीच उद्योग उभारण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे.

गावाकडे परतल्यानंतर केतन चव्हाण यां तरुणाने पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे ठरवले. यासाठी त्याने व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून गोट फार्मिंगचा (शेळीपालन) यशस्वी व्यवसाय सुरू केला. पडीक जमिनीचा योग्य वापर करत मोठ्या प्रमाणावर आंब्याची लागवड केली. यासाठी केतन यांनी ‘स्वदेस फाउंडेशन’ ची मदत घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. पाण्याचे नियोजन आणि शाश्वत शेतीसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून स्वतःच्या शेतात आधुनिक शेततळे उभारले. या त्रिसूत्रीच्या जोरावर केतनने केवळ स्वतःचा व्यवसायच उभा केला नाही, तर स्थानिक पातळीवर ग्रामीण तरुणांसाठी रोजगार आणि उद्योगाची एक नवी दिशा निर्माण केली आहे.

गावात राहूनही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि निव्वळ मेहनतीच्या जोरावर ती यशस्वीपणे साकारता येतात, हे केतन चव्हाण यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल वाफेघर व परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील प्रवासासाठी सर्वस्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

चव्हाणांचा प्रवास तरुणांसाठी मार्गदर्शक
केतन चव्हाण यांचा हा प्रवास आजच्या सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरत आहे. शहरात जाऊन चाकोरीबद्ध नोकरी करण्यापेक्षा आपल्या गावातच निसर्गाच्या साक्षीनं उद्योग उभारणे शक्य आहे, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
Exit mobile version