| महाड | वार्ताहर |
महाड तालुक्यातील खैरे गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. शेजारी येत असलेल्या कंपनीला विरोध म्हणून त्यांनी अनेक वेळा शासकीय पातळीवर पत्रव्यवहार केला. मात्र, या पत्राला कोणतेच उत्तर न आल्याने अखेर ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
महाड औद्योगिक क्षेत्रातील खैरे गावातील ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळपासूनच मतदान केंद्रावर न जाता गावातच थांबून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. गावाच्या शेजारी एक रासायनिक कंपनी येत असून, या कंपनीला ग्रामस्थांनी वारंवार विरोध दर्शवला. याबाबत त्यांनी शासकीय पातळीवर अनेकवेळा पत्रव्यवहारदेखील केला आहे. मात्र, या पत्रांना उत्तर न दिल्याने अखेर ग्रामस्थांनी मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. सकाळपासून शासकीय पातळीवर ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, शासकीय अधिकार्यांना यामध्ये अपयश आले.
ग्रामस्थांनी दुपारी चार वाजेपर्यंत आपला विरोध कायम ठेवून जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहू, असे ठणकावून सांगितले. खैरे गावामध्ये जवळपास 735 मतदार आहेत. महाड महसूल विभागाचे नायब तहसीलदार श्री. भाबड यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. मतदानाचा हक्क बजावून त्यानंतर आपला विरोध कायम ठेवा, असे सुचवले. मात्र, मतदारांनी विरोध दर्शवत मतदानावर असलेला बहिष्कार ठाम ठेवण्याचा निर्णय घेतला.