| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खालापूर तालुक्यात बऱ्यापैकी फार्म हाऊस आहेत. थर्टी फस्टचा आनंद लुटण्यासाठी येथील फार्म हाऊसवर त्यांचे मालक आले आहेत. तसेच, काही ठिकाणी पर्यटकांनी अगोदरच बुकिंग करून ठेवल्याने नववर्षाच्या पुर्वसंध्येला खालापूरातील फार्म हाऊसवर मोठी गर्दी केली होती. यादरम्यान, पर्यटकांकडून अनुचित प्रकार, अपघात तसेच अधिकची संकटे टाळण्यासाठी खालापूर पोलिसांनी रिसार्ट आणि फार्महाऊसवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. याची माहिती खालापूरचे पोलीस निरिक्षक सचिन पवार यांनी दिली आहे.
खालापूर तालुक्यातील चौक, बीड जांबरूग, केळवली माणकीवळी तसेच खोपोली शहरापासून काही अंतरावर गारमाळ यापरिसरात ठाकरे बंधु बरोबरच अनेक सेलिब्रिटींची, राजकारणी, विविध क्षेत्रातील व्यावसायिक, बिल्डर, उच्चपदस्थ अधिकारी यांनी फार्म हाऊस बांधले आहेत. तसेच, अँडलँब इमिजिका, कँममँक्स, मँटेरिया या ठिकाणी थर्टी फस्टची पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. यादरम्यान, पोलिसांचा फौज फाटा रस्त्यावर ठिकठिकाणी होता. यावेळी नाकाबंदी करून वाहनांची, चालकांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये मद्य प्राशन कलेले आढळल्यास त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाते. तसेच, या दिवशी अपघात होण्याची शक्यता जास्त असल्यामुळेच या पोलिसांच्या कारवाईपासून अलिप्त राहण्याची फार्म हाऊसमध्ये पार्टी करण्याकडे अनेकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी फार्म हाऊसवर डीजेच्या तालावर दंग होताना कोणत्याही सोसायटीला अथवा नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





