लाखोंचा गुटखा, पानमसाला जप्त
| खोपोली | प्रतिनिधी |
कागदावर गुटखाबंदी असली तरी राज्याच्या कानाकोपऱ्यात गुटखा राजरोस विक्री होताना दिसत आहे. राज्य शासनाने 13 वर्षांपूर्वी गुटख्यावर बंदी घातली आहे. तरी देखील गुटखा तस्करांनी अवैधरित्या गटखा तस्करी सुरू ठेवली आहे. अशातच पुणे-मुंबई महामार्गावरून एका टेंम्पोमधून होणाऱ्या विमलपान मसाला व गुटख्याची होणारी तस्करी उघडकीस आली आहे. खालापुर पोलिसांनी सावरोली टोलनाका येथे सापळा रचून धडक कारवाई करत हा प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईत टेम्पोसह साडेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्यातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात गुटखा खाण्याच्या आहारी जात आहे. त्याचप्रमाणे गुटख्याच्या सेवनामुळे फुफ्फुस, तोंड आणि आतड्यांच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण विचारातत घेऊन तत्कालीन सरकारने 20 जुलै 2012 रोजी राज्यात गुटखाबंदी लागू केली होती. असे असतानाही छुप्या पद्धतीने राजरोसपणे गुटखा विक्री होत आहे. त्यामुळे गुटखाबंदीवर ठोस कारवाई व्हावी अशी मागणी होत असताना पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड व खालापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक फौजदार संदीप पाटील यांना 13 सप्टेंबर रोजी विमलपान मसाला व गुटखा याची अवैध वाहतुक सावरोली टोलनाका येथुन मुंबई-पुणे जुन्या महामागनि एका टेम्पोतून होणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनाी खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या पथकाला प्राचारण केले. दरम्यान, एक छोटा हत्ती टेम्पो सावरोली कनेक्टर रोडकडुन खालापुर बाजुकडे येताना दिसला. त्यावेळी पोलीसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, टेम्पोचालक गाडी थांबवुन अंधाराचा फायदा घेत पळून गेला. या टेम्पोची तपासणी केली आसता त्यात पांढऱ्या व खाकी रंगाच्या बारदानच्या गोणींमध्ये विमल पानमसाला व गुटखा असल्याचे निर्दशनास आले. यामध्ये 52 हजार 800 रुपये किमतीचा तंबाखु असलेल्या सफेद रंगाच्या 12 नायलॉनच्या गोणी, 9 हजार रुपयाचे खाकी रंगाच्या बारदानाच्या 3 लहान गोणी, 10 लाख 89 हजार रुपयाचे केसरयुक्त विमल पानमसाला असलेल्या खाकी रंगाच्या बारदानच्या 25 मोठ्या गोणी व वाहतुकीसाठी वापरलेला 4 लाख रुपयाचा छोटा हत्ती टेम्पो असा एकूण 16 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे खालापूर पोलीस व रायगड गुन्हे अन्वेषण शाखाच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कारवाई रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे, खालापुर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, उप पोलीस अधिकारी राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील, सहाय्यक फौजदार मोहन भालेराव, संदीप पाटील, बाळकृष्ण जाधव, आशिष पाटील या पथकाने केली आहे.
कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खालापूर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असल्याचे आढळून आल्यास जनतेने खालापूर पोलीस ठाण्यास संपर्क करून कळवावे.
सचिन पवार,
पोलिस निरीक्षक, खालापूर







