जुगार अड्ड्यावरील लाखोंचा माल हस्तगत
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील चौक परिसरातील वावढळ येथील लीलाज फार्महाऊसमध्ये खालापूर पोलिसांनी बेकायदा जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी एकूण 29 लाखांचा माल हस्तगत केला आहे. ही धडक कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहूल यांच्या आदेशाने खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यामुळे अवैध जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अनेक जण आरामात व कमी वेळात जास्त पैसे मिळावे म्हणून वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करत असतात. त्यात अनेकजणं अवैध धंद्यांचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. काहीजणं जुगारांमधून पैसे कमविण्याचा धंदा करत आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांना चाप बसावा म्हणून रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सुचनेनुसार खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कारवाया सुरू आहेत. त्यात आता मोठ्या कारवाईची भर पडली आहे. खालापुर पोलिसांनी रविवारी (दि.14) रात्रीच्या सुमारास वावढळ येथील लीलाज फार्महाउसमध्ये चालणाऱ्या अवैध जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली. त्यात जवळपास एकूण 29 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये 4 चारचाकी वाहने व 3 दुचाकी वाहनांचा समावेश आहे. तसचे, या कारवाईत 11 जणांना ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार करित आहेत. त्यामुळे खालापूर पोलिसांच्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून अवैध जुगार खेळणाऱ्यांचे या कारवाईने धाबे दणाणले आहेत.
जुगाराच्या नादातून अनेक जण कर्जबाजारी होत आहेत. अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे जुगाराला आळा बसावा म्हणून पोलीस प्रशासनाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कोणी जुगार खेळण्याची माहिती मिळाल्यास त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी जुगार खेळण्याची माहिती असल्यास खालापूर पोलिसांना देण्यात यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल.
सचिन पवार,
पोलीस निरीक्षक, खालापूर
