|खोपोली |प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील निगडोली गावातमधील एका घरात वृध्द दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.२६) उघडकीस आली. या दुहेरी हत्याकांडामुळे खालापूर तालुका हादरला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रघुनाथ दत्तू फराट ( ७५ ) आणि त्यांची पत्नी सुरेखा रघुनाथ फटाट ( ७२) अशी मृतांची नावे आहेत. त्यांची हत्या कोणत्या कारणातून झाली याचा तपास खालापूर पोलिसांसह अन्य तपास यंत्रणेकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेतून सेवानिवृत्त झालेले रघुनाथ फराट आणि त्यांची पत्नी सुरेखा फराट हे दोघेच निगडोली राहत होते. त्यांची मुले खोपोली व खालापूर मध्ये वास्तव्यात आहेत. मंगळवारी दिवसभर रघुनाथ फराट यांचा मोबाईल बंद येत असल्याने त्यांच्या मुलाला संशय आला. काहीतरी अघटीत घडल्याच्या भीतीने त्यांनी फराट यांचा नातू आदित्य फराट याला निगडोलीतील गावी पाठवले.
आदित्यने घराचा दरवाजा वाजवला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय बळावल्याने आदित्याने मागच्या दरवाजातून घरात प्रवेश केला. आत जाताच त्याला समोर आजी-आजोबा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. हा भयानक प्रकार पाहून आदित्याने आरडाओरडा केला, ज्यामुळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. हल्लेखोरांनी रघुनाथ फराट यांचा धारदार शस्त्राने गळा कापला होता, तर त्यांची पत्नी सुरेखा यांच्या तोंडावर गंभीर वार केले होते.
घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून, घरातून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत. घरफोडीच्या उद्देशाने ही हत्या झाली की जुन्या वादातून? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. नातेवाईकांच्या आक्रोशाने निगडोली गावावर सध्या शोककळा पसरली आहे.
