। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पाणी पुरवठ्यावरून दादागिरी करीत खंडाळे ग्रामपंचायत कर्मचार्याला बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थकांने दमदाटी करून मारहाण केल्याची घटना नेहूली येथे रविवारी (दि.16) घडली. मारहाणीत जखमी झालेला ग्रामपंचायत कर्मचारी सुरज सुहास पाटील (वय 30, खंडाळे) याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी त्यांना ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील यांनी निरोप देत प्रकाश रामभाऊ पाटील (वय 60 वर्ष, रा. नेहुली) यांनी बोलावल्याचे सांगितले. त्यानुसार सूरज पाटील हे तेथे गेले असता त्यांना प्रकाश पाटील यांनी तु जुन्या लाईनला पाणी सोडु नकोस, असे बोलून दमदाटी केली. सूरज पाटील हे पाणी पुरवठ्याचे सरकारी काम करीत असताना प्रकाश पाटील यांनी सरकारी कामात अडथळा करुन हाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळी केली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सूरज पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा प्रकार कळताच उपसरपंच अशोक थळे, माजी उपसरपंच संतोष कनगुटकर, नरेश गोंधळी आदींसह सर्व सदस्यांनी त्यांची भेट घेवून विचारपुस केली. सदर प्रकार निषेधार्थ असून आरोपीला अटक करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.