| पनवेल | प्रतिनिधी |
सिडकोच्यावतीने 2013 साली खांदा वसाहत येथे खांदेश्वर पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यात आली होती. या इमारतीवचे उद्घाटन तत्कालीन राज्याचे गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु, अवघ्या काही वर्षांतच या इमारतीला समस्यांचे ग्रहण लागले. त्यामुळे या इमारतीतील पोलीस ठाणे सेक्टर 8 मधील एका तीन मजली बंगल्यात स्थलांतरित करण्यात आले होते. परंतु, आता ती जागा देखील अपूरी पडत असून, जुनी इमारत तोडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याची मागणी जोर धरत आहे.
सिडकोच्यावतीने खांदा वसाहत येथे खांदेश्वर पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यात आली होती. मात्र, काही वर्षांतच या इमारतीच्या पायथ्याखालून उंदीर पोखरणे, भिंतींना वाळवी लागणे आणि लाद्या वर येणे अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या. परिणामी, या इमारतीत काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ती इमारत रिकामी करून सेक्टर 8 मधील एका तात्पुरत्या तीन मजली बंगल्यात पोलीस ठाणे स्थलांतरित करण्यात आले. सध्या या तात्पुरत्या ठिकाणी शंभरहून अधिक कर्मचारी काम करत असून बसण्यासाठी आणि विभाग चालवण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे समोरील मोकळ्या भूखंडावर कंटेनर बसवून काही विभाग तिथे हलविण्यात आले आहेत. नवीन पनवेल सेक्टर 6 येथे सिडकोकडून काही गुंठे भूखंड खांदेश्वर पोलीस ठाण्यासाठी देण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयाकडून काही निधी देखील देण्यात आला आहे. मात्र, त्याची पावती अद्याप सिडकोकडून मिळालेली नाही. परिणामी काम सुरू होण्यास विलंब होत असून, दरमहा लाखो रुपयांचे भाडे तात्पुरत्या बंगल्यासाठी खर्च होत आहे. त्यामुळे जुनी धोकादायक इमारत पाडून किंवा नवीन जागेवर पोलीस चौकी उभारण्याची प्रक्रिया गतीमान करण्याची मागणी स्थानिक पातळीवर जोर धरत आहे.
खांदेश्वर पोलिसांची परवड
