अंधश्रध्दा निमुर्लन समितीच्या वतीने निदर्शने
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भोंदूबाबा म्हणून परिचित असलेले अशोक खरात यांच्या कृत्याच्या विरोधात अलिबागमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी सकाळी (दि.25) निदर्शने करण्यात आली. नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली शांततामय मार्गाने निषेध व्यक्त करण्यात आला.
वेगवेगळ्या पध्दतीने भोंदुगिरी करून अत्याचार करणाऱ्या अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. त्याच्या विरोधात पोलिसांनी कारवाईदेखील सूरू केली आहे. नाशिक येथील विकृत बलात्कारी भोंदू अशोक खरात याच्या कृत्याविरोधात रायगड जिल्हयात देखील प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे. वेगवेगळ्या संस्था संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने अलिबागमध्ये बुधवारी खरातप्रकरणी निषेध व्यक्त करण्यात आला. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. त्यांनी खरात विरोधात निषेध व्यक्त करीत निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले. सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत शांततामय पध्दतीने निषेध व्यक्त केला. यावेळी खरात यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
