। खरोशी । वार्ताहर ।
सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी हे कायदे बनविण्याचे काम करीत असतात. कधी कालबाह्य कायद्यात बदल केले जातात. परंतु ए. टी. पाटील यांच्यासारखे पंडित हे भविष्याचा वेध घेऊन समाजाला पूरक असे नवे कायदे सूचवून ते अस्तित्वात आणत असतात. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे खारलँड कायदा असल्याचे प्रतिपादन माजी आ. धैर्यशील पाटील यांनी केले. आगरी समाज मंचाचे अध्यक्ष धर्माजी म्हत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पेणच्या महात्मा गांधी मंदिर सभागृहात रविवारी (दि.28) ए. टी. पाटील यांचा 99 वा जयंतीदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ .सिद्धार्थ पाटील, सूर्यकांत पाटील, अरविंद वनगे, जगन्नाथ जांभळे, अशोक मोकल, नंदा म्हात्रे, डी. एम. म्हात्रे, डॉ. अनिरुद्ध पाटील, सदानंद ठाकूर, लक्ष्मण पाटील, न्या. डी. पी. म्हात्रे, धर्माजी म्हात्रे उपस्थित होते.
यापुढे मार्गदर्शन करताना धैर्यशील पाटील म्हणाले की, भौगोलिकदृष्ट्या खारभूमीचे महत्त्व अनुभवलेल्या आणि स्वतः जगलेल्या ए. टी. पाटील यांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर ही खारभुमीची बाब शासनाच्या गळ्यात उतरविली. खारभूमीच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात आणला. ही समाजाला मिळालेली फार मोठी देणगी आहे, असे गौरवोद्गार पाटील यांनी काढले.
खचाखच भरलेल्या सभागृहात कर्मयोगी ए. टी. पाटलांच्या जीवन कार्याचे अनेक पैलू उलगडताना वक्त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. तर त्यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला.
ए. टी. पाटील व्यक्ती नव्हे तर ती एक विचारशक्ती होती. समाज देवो भव! हा मंत्र देत त्यांनी समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. राजकारण शुध्द चरित्र्य जपत, भ्रष्टाचाराला मूळीच थारा दिला नाही. समाजाची गुणवत्ता वाढवून स्वाभिमानी जगण्याची शिकवण दिली. शिक्षणाला प्राधान्य देत गुलामगिरी झुगारुन आत्मसन्मान जपण्याचा सल्ला दिला. अशा मौलिक विचारांनी सभागृह मंत्रमुग्ध झाला.
कोणतेही मोर्चे, धरणे, आंदोलने न करताही आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या जोरावर समाजाच्या मूलभूत प्रश्नांची, समस्यांची चुटकीसरशी सोडवणूक करण्याची किमया कर्मयोगी ए. टी. पाटील यांनी साध्य करुन दाखवली. परंतु अलीकडे प्रचंड धावपळीच्या आणि धकाधकीच्या युगात माणसाकडे लढ्यासाठी वेळ देणे शक्य होत नाही. अशा. पार्श्वभूमीवर आजही त्यांचे विचार नव्या पिढीला अत्यंत उपयुक्त, मार्गदर्शक आणि दीपस्तंभ ठरणारे आहेत. त्या विचारांचा प्रचार आणि प्रसार गावोगावी पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे विचार उपस्थितांनी मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पाटील यांनी तर आभार दिलीप पाटील यांनी व्यक्त केले.