दुप्पट वाढ केल्याने नागरीकांचा संताप
। पेण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपट्टीमध्ये दुपटीने वाढ केली आहे. आधीच पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आणि त्यातच आता पाणीपट्टी वाढवल्याचा संताप व्यक्त करत या भागातील ग्रामस्थांनी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर पाणीपट्टी देयकांची होळी केली.
त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून प्रभाकर म्हात्रे (हरिओम) यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, लोकप्रतिनिधी म्हणून पाणी प्रश्नाबरेाबर मी खारेपाट जनतेसोबत आहे. दि.24 मार्च 2020 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मी स्वतः खारेपाटात आलेल्या पाणी पट्टीच्या संदर्भात भूमीका मांडत प्रशासनाला सांगितले की, माझ्या विभागात होणार पाणीपुरवठा हा तुटपुंजा असून तो पाणी पुरवठा योग्य प्रकारे व वेळेवर होत नाही. त्यामुळे माझ्या विभागातले नागरिक दुपटीची पाणीपट्टी भरणार नाहीत. जो मी प्रश्न उपस्थित केला त्याचे सर्व पुरावे सोबत घेऊन आलेलो आहे.
त्यावेळी सभागृहात अर्थ व बांधकाम सभापती अॅड.निलिमा पाटील यांनी देखील सदरील पाणीपट्टीवर पुर्नविचार करण्यात यावे असे सांगून अधिकारीवर्गाला कशा प्रकारे पाणीपट्टी दुपट केली याचाही जाब विचारला. तसेच हा पाणीपट्टीचा प्रश्न पुढील सभेमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपण निकाली काढूच व तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सोबत असणार आहे. त्यामुळे दुप्पट पाणीपट्टी भरण्याचा प्रश्न निर्माण होणारच नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी खारेपाटातील सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त करून दुप्पट झालेल्या पाणीपट्टीचा निषेध केला. तसेच पाणीपट्टी देयकाची होळी देखील केली. हा पुर्ण संघर्ष कोरोनाचे नियम पाळून करण्यात आले.