इव्हेंट मँनेजमेंटसाठी 5 कोटी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खारघर दौरा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान खारघरमध्ये येण्याच्या तारखा अनेकदा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकारीही हवालदिल झाले आहेत. मोदींच्या स्वागतासाठी अनेकदा तयारी केल्यानंतर दौरा रद्द झाल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. प्रशासनाने केलेल्या नियोजनानूसार पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी 12 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये 8 कोटी रुपये मैदानावर खर्च करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ऑक्टोबरला खारघरमध्ये येण्याची शक्यता होती. त्यामुळे पनवेल महापालिकेने दिवसरात्र कामगार लावून शहर सौदर्यीकरण, मैदान साफसफाईची तयारी सुरू केली होती. हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. परंतू तारीख निश्चित होत नव्हती. 30 ऑक्टोबर तारीख निश्चित होताच सिडकोने जबाबदारी स्विकारून काम सुरू केले. मात्र शनिवारी रात्री सुरू केलेले मैदानाचे काम रविवारी रात्री बंद करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
30 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित असलेल्या सोहळ्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू असलेल्या उलवे गाव परिसर विकसित करण्यात येणार आहे. काही तासांच्या सोहळ्याला 6 लाख चौरस फुटांचे मैदान विकसित करण्यासाठी सिडको तब्बल 8 कोटी 16 लाख रूपयांचा खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सिडकोकडून इव्हेंट मँनेजमेंट कंपनीला याव्यतिरिक्त 5 कोटींचा खर्च केला जाणार आहे.
सिडको मेट्रोच्या उद्घाटनाला आपल्या श्रीमंतीचे दर्शन घडविणार आहे. सहा लाख चौरस फुटांचा जर्मन हँगर प्रकारचा भव्य मंडप, मंडपात कुलर, वातानुकूलीत यंत्रणेसह कार्यक्रमाचे सुष्म नियोजन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमासाठी सिडकोने तब्बल 5 कोटी रूपये खर्च करून ही सर्व कामे इव्हेंट मँनेजमेंट कंपनीला दिली आहेत. त्यामुळे एका दिवसाच्या कार्यक्रमाला इतका खर्च कशासाठी, अशी टिका होत आहे. एवढ्यावरच न थांबता सिडकोकडून याच कार्यक्रमासाठी याव्यतिरिक्त आणखी 8 कोटी 16 लाख रूपये खर्च केले जाणार आहेत.
पगारावर 5 कोटींचा खर्च
नवी मुंबई मेट्रो प्रकल्प सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या आतापर्यंत पूर्ण करण्यात आल्या आहेत. मात्र मेट्रो सेवा सुरु करण्यासाठी मुहूर्त न मिळाल्याने मेट्रो सेवा सुरु करण्याकरीता भरती करण्यात आलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारापोटी सिडकोच्या तिजोरीतून आतापर्यत पाच कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
मैदानासाठी असा करणार खर्च
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू असलेल्या जागेत कार्यक्रमासाठी सिडकोला मैदान उभे करावे लागणार आहे. या जागेवर दगडी भराव असल्यामुळे भराव टाकून मैदान तयार करावे लागणार आहे. मंडप क्षेत्रात मैदान तयार करण्यासाठी 2 कोटी 50 लाख 49 हजार पहिला टप्पा, महाराष्ट्र भरातून येणाऱ्या अडीच हजार बस, 5 हजार लहान वाहनांसाठी पार्किंगसाठी मैदान 2 कोटी 46 लाख 28 हजार रुपयांचा दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्यात मैदानाची इन्ट्री, एक्झिट आणि स्टेजच्या मागील रस्ता विकसित करण्यासाठी तब्बल 3 कोटी 20 लाख 4 हजार रूपये खर्च केले जाणार आहेत.
निविदा प्रसिद्ध
तीन टप्प्यात एकूण 8 लाख 16 हजार रूपयांचा खर्च होणार आहे. विमानतळाचे काम पाहणारे अधिक्षक अभियंता कार्यालयाने या कामांच्या निविदा मागील दोन दिवसांत प्रसिद्ध केल्या आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचे उदघाटन करण्यासाठी एक दिवसाच्या कार्यक्रमाला एकूण खर्च 12 कोटीपेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे सिडकोकडून सुरू केलेल्या तयारीची चर्चां सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगली आहे. यापुर्वी नियोजित केलेल्या खारघरमधील कार्पोरेट मैदान तयार असताना तिथे हा कार्यक्रम का घेतला जात नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.