| पनवेल । वार्ताहर ।
शहरातील प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यात रस्त्यांलगत टेम्पो उभे करून फळे विक्री करणार्यांचादेखील यात समावेश आहे. अशातच या विक्रेत्यांकडे येणार्या ग्राहकांकडून रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. परिणामी, खारघरमधील उत्सव चौक ते टाटा हॉस्पिटलदरम्यान वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवत आहे.
खारघरमधील उत्सव चौककडून टाटा हॉस्पिटलमार्गे तळोजाकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर सेक्टर 30 ते 36 तसेच तळोजामार्गे कल्याण आणि मुंब्राकडे जाणार्या वाहनांची वर्दळ असते. याशिवाय गोल्फ कोर्समध्ये बाहेरून येणारे खेळाडू, इस्कॉन मंदिरात येणारे भक्त आणि सेंट्रल पार्कमध्ये नवी मुंबई, पनवेल, कामोठे येथून येणार्या पर्यटकांच्या वाहनांमुळे गर्दी वाढली आहे. असे असताना सतत वर्दळ असलेल्या या रस्त्यालगत फळ, भाजी आणि आईसस्क्रीम विक्री करणार्या काही टेम्पोचालकांनी अतिक्रमण करून स्वतःचा व्यवसाय थाटला आहे. विशेष म्हणजे या विक्रेत्यांकडे येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या या अतिक्रमणाकडे पालिका आणि वाहतूक विभागाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे खारघरवासी वेठीस धरला गेला आहे.
प्रशासन बघ्याच्या भूमिकेत उत्सव चौकाकडून सेंट्रल पार्ककडे जाणार्या रस्त्याच्या कडेला पदपथावर फळ खरेदी करून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या वाहनांमुळे महिला गंभीर जखमी झाली होती, असे असतानादेखील पालिकेचे अतिक्रमण अधिकारी आणि खारघर वाहतूक केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.