खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!

3,400 गोपनीय गणनापत्रके झेरॉक्स सेंटरवर
सूरज पाटीलवर गुन्हा, पाच बीएलओ निलंबित

| पनवेल | प्रतिनिधी |

निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेला थेट धक्का देणारा धक्कादायक प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. निवडणूक आयोगाची तब्बल 3,400 अतिसंवेदनशील गणनापत्रके चक्क खासगी झेरॉक्स सेंटरवर झेरॉक्स करण्यासाठी आणण्यात आल्याने खारघर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सूरज पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, शासकीय कागदपत्रांची सुरक्षितता आणि गोपनीयता राखण्यात गंभीर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पाच बीएलओंना तात्काळ निलंबित केले आहे. या घटनेने निवडणूक यंत्रणेच्या कारभारावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

27 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खारघर सेक्टर 19 मधील एका खासगी झेरॉक्स सेंटरमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकृत गणनापत्रकांची छपाई सुरू असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. त्यावेळी सूरज पाटील हा सुमारे 3,400 गणनापत्रके झेरॉक्स करण्यासाठी घेऊन आल्याचे आढळून आले.

दरम्यान, पनवेलचे नायब तहसीलदार सुनील जाधव यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. गणना पत्रके झेरॉक्स केंद्रापर्यंत कशी पोहोचली आणि कोणाच्या सूचनेवरून त्यांची झेरॉक्स काढण्यात आली, याबाबत पंचनामा करण्यात आला. गणना पत्रकांचे वितरण, संकलन आणि सुरक्षित हाताळणी यामध्ये कोणाकडून त्रुटी झाली, याचाही तपास सुरू आहे.

प्रशासनाने या कागदपत्रांची तपासणी केली असता ती खारघर क्षेत्रातील 11 वेगवेगळ्या मतदान केंद्रांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, यातील पाच मतदान केंद्रांशी संबंधित गणनापत्रकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे तपासात समोर आले. निवडणूक आयोगाची संवेदनशील कागदपत्रे अधिकृत परवानगीशिवाय खासगी व्यक्तीच्या ताब्यात कशी गेली, हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. पक्षाचे उपनेते बबन पाटील, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, नगरसेविका लीना गरड, महानगरप्रमुख समाधान काशीद, विभागप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, विश्वास पेटकर, नगरसेवक उत्तम मोर्बेकर, नितीन गावंड, कैलास पाटील आदींनी या घटनेचा तीव्र निषेध केला. संबंधितांवर कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

पदाधिकाऱ्यांनी खारघर पोलीस ठाण्यात ठिय्या देत प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय कागदपत्रे खासगी झेरॉक्स सेंटरपर्यंत पोहोचलीच कशी, याचा छडा लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या प्रकरणाची गंभीर दखल रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि प्रांताधिकारी पवन चांडक यांनी घेतली. निवडणूक आयोगाची शासकीय आणि अत्यंत गोपनीय कागदपत्रे अनधिकृतपणे बाळगणे तसेच ती खासगी ठिकाणी झेरॉक्स करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेची गोपनीयता हा लोकशाहीचा कणा मानला जातो. त्यामुळे गोपनीय कागदपत्रे झेरॉक्स सेंटरपर्यंत पोहोचण्याचा हा प्रकार केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा आहे की त्यामागे आणखी काही गंभीर कारण आहे, याचा उलगडा चौकशीतून होणे अत्यावश्यक आहे.

पाच बीएलओंच्या दप्तरातून कागदपत्रे बाहेर
प्रशासकीय तपासात आणखी गंभीर बाब समोर आली. संबंधित पाच बीएलओंच्या दप्तरातून प्रत्येकी शंभरहून अधिक गणनापत्रके अनधिकृत व्यक्तीच्या ताब्यात गेल्याचे आढळून आले. या कागदपत्रांची जबाबदारी असलेल्या बीएलओंनी स्वतःची शासकीय जबाबदारी इतरांकडे सोपविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता पाचही बीएलओंना निलंबित केले. त्यांच्याविरोधात विभागीय शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात आली आहे. मात्र, विभागीय चौकशी सुरू असल्याने संबंधित बीएलओंची नावे सध्या जाहीर करण्यात आलेली नाहीत.

सूरज पाटील याच्याविरोधात भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आणि निवडणूक प्रशासनाकडून सुरू आहे.

गोपनीयतेला भगदाड कोणी पाडले?
निवडणूक आयोगाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असतानाही ती थेट खासगी झेरॉक्स सेंटरपर्यंत पोहोचली. त्यामुळे 3,400 गणनापत्रके बाहेर जाण्याच्या संपूर्ण साखळीत नेमके कोण कोण सहभागी होते? कागदपत्रे कोणाच्या आदेशाने बाहेर काढण्यात आली? त्यांची झेरॉक्स का करण्यात येत होती? या कागदपत्रांचा पुढे काय वापर होणार होता? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. सध्या प्रशासनाने पाच बीएलओंवर कारवाई करून पहिला धक्का दिला असला तरी, या प्रकरणामागील संपूर्ण यंत्रणा उघडकीस येणार का आणि आणखी कोणावर कारवाई होणार, याकडे खारघरकरांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक प्रक्रियेतील गोपनीय कागदपत्रांची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. संबंधित कागदपत्रे अनधिकृत व्यक्तीच्या ताब्यात कशी गेली, याचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात ज्या पाच बीएलओंच्या दप्तरातून मोठ्या प्रमाणात गणनापत्रके बाहेर गेल्याचे निष्पन्न झाले, त्यांना निलंबित करण्यात आले असून, विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोषी व्यक्ती कोणत्याही स्तरावरील असो, चौकशीत दोष सिद्ध झाल्यास नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.

– किशन जावळे, जिल्हाधिकारी

Exit mobile version