| चिरनेर | वार्ताहर |
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.22) ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन खारघर मॅरेथॉन 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बुधवारी (दि.18) खारघर येथे पत्रकार परिषद देण्यात आली. या स्पर्धेचे सहप्रायोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन हे आहेत. खारघरमधील सेक्टर 19 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार असून, पारितोषिक वितरण सोहळाही त्याच ठिकाणी सकाळी नऊ वाजता होणार आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या मॅरेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. किरीट सोमय्या, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तर प्रमुख मान्यवर म्हणून आ. महेश बालदी, अभिनेता मॉडेल निर्माता मिलिंद सोमण, बॉलीवूड हास्य अभिनेता राजपाल यादव, सिने अभिनेता व दिग्दर्शक आदिनाथ कोठारी, सिने अभिनेत्री सई मांजरेकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
यातील पुरुष खुला गट व महिला खुला गटासाठी शंभर रुपये तर उर्वरित गटासाठी वीस रुपये नाममात्र प्रवेश फी असणार असून, ही प्रवेश फी सामाजिक उपक्रमासाठी वापरली जाते. तसेच शाळा व गृहसंकुल सोसायटींना खेळामध्ये भाग घेण्यासाठी उत्तेजन देता यावे यासाठी त्यांना प्रवेश शुल्कामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.