उरणमध्ये पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या

विहिरी कोरड्या, ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट

। उरण । प्रतिनिधी ।

शेतीच्या खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली असून शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जून महिना मध्यावर आला असतानादेखील पेरणीयोग्य पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच भूजलसाठ्याने तळ गाठल्यामुळे विहिरी, बोअरवेल यांनाही पाणी नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.

उरण परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि नागरी विकास होत असून त्यासाठी जमिनी संपादित झाल्या आहेत. मात्र तरीही येथे 2,500 हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर भात पिकाची लागवड होते. तर तालुक्यातील अनेक ठिकाणी शिल्लक जमिनीही कसल्या जात आहेत. मृग नक्षत्राची पेरणी खरीपासाठी उत्तम असते. त्यामुळे चांगला पाऊस मृग नक्षत्रात होईल. या आशेने शेतकऱ्यांनी महागडी बी बियाणे, खतांची जमवाजमव केली.

शेतीची मशागत केली. मात्र पाऊस होत नसल्यामुळे पेरणी करावी की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. समजा कधीतरी बरसणाऱ्या सरींवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी केलीच, तर बियाणे वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाडीभागात काही शेतकऱ्यांनी धूळ वाफेवरची पेरणी करून घेतली आहे.

मात्र, पावसाचा असाच दडीचा गोंधळ सुरू राहिला. तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊन शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसेल. जून महिना निम्म्यावर आला असताना पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातील भूजलसाठ्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांसह गुरे, झाडे यांना पाण्याच्या टंचाईची मोठी झळ बसत आहे.

तीव्र उकाड्याने नागरिकही हैराण झालेले आहेत. कधी एकदा पाऊस पडेल याची शेतकऱ्यांसह नागरिक दररोज चातकासारखी वाट पाहात आहेत. पाऊस लांबल्याने यावर्षी पीक उशिराने येणार आहे. त्याचप्रमाणे लावण्याही लांबणार असल्याने आत्ताच 50 टक्के नुकसान झाले आहे.

– महेश ठाकूर, शेतकरी

Exit mobile version