पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण 1 लाख 1 हजार 73 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र भातपिकाचे (98 हजार 36 हेक्टर) आहे. त्याखालोखाल 3 हजार 37 हेक्टरवर नाचणी पिकासाठी नियोजन आहे. खरिपाचा नियोजन आराखडा तयार करताना येथील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या पिकांची माहिती द्यावी, खते, बियाणे, पीक कर्जपुरवठा सुरळीत होईल, याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी, अश्या सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक शुक्रवारी जिल्हा नियेाजन भवन येथे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील तटकरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे, तर जिल्हा नियोजन सभागृहात आ. रवींद्र पाटील, आ. अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले व इतर विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
खरीप हंगामातील भातपिकासाठी 98 हजार 36 हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून, भातपिकासाठी 3 हजार 176 किलोग्रॅम/हेक्टर उत्पादनाचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे. खरीप हंगामातील नाचणी पिकासाठी 3 हजार 37 हेक्टर क्षेत्रावर नियोजन, तर 1 हजार 322 किलोग्रॅम/हेक्टर उत्पादनाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या हंगामातील भातपिकासाठी 17 हजार 450 क्विंटल बियाणांची, नागली पिकासाठी 150 क्विंटल बियाणांची, तूर पिकासाठी 850 क्विंटल बियाणांची, मूग पिकासाठी 55 क्विंटल बियाणांची, भाजीपाला व इतर पिकासाठी 175 क्विंटल बियाणांची, उडीद पिकासाठी 90 क्विंटल बियाणांची, अशी एकूण 19 हजार 400 क्विंटल बियाणांची गरज असून, दि.10 मेअखेर 8 हजार 945 क्विंटल भात बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. या वर्षासाठी 17 हजार 460 मेट्रिक टन खतांचे आवंटन असून, आतापर्यंत 1 हजार 160 मेट्रिक टन पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण 55 हजार 408 विविध योजनेतील पीक प्रात्यक्षिके करण्यात आली. जिल्ह्यात सन 2022-23 मध्ये धान खरेदी 5 लाख 70 हजार 404 क्विंटल झाली आहे.
जिल्ह्यात 2023-24 या वर्षात एकूण 6 हजार हेक्टर क्षेत्रासाठी माती नमुना तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रासायनिक खतांचा वापर कमी करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. या वर्षात 1 हजार 785 हेक्टर (300 मेट्रिक टन) युनिया डीएपी ब्रिकेट्स, नॅनो युनिया-500 हेक्टर (1 हजार लिटर) असे नियोजन करण्यात आले आहे. या खरीप हंगामात कर्ज वाटप लक्षांक 51 हजार 996 शेतकरी लाभार्थी असून, त्यांना 38 हजार 101 लाख रुपये कर्ज वाटप लक्षांक आहे.
जिल्हा कृषी विभागाने केलेल्या खरीप हंगाम 2023 च्या नियोजनाचा आढावा घेऊन पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी योजना पोहोचविण्यासाठी व शेतकऱ्यांना थेट मदत देण्याच्या दृष्टीने कृषी अधिकाऱ्यांनी काम करावे. खरीप हंगामात खते, बी-बियाणे वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे वर्ष वाया गेले, अशी परिस्थिती उद्भवू नये, शेतकऱ्यांना खतांचा व बी-बियाणांचा पुरेसा पुरवठा होईल, याची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाने प्रयत्न करावेत. कोकणातील जमिनीची उपलब्धता पाहून शेतीसाठीच्या पाणी साठविण्यासाठी जलकुंभ यासारख्या नाविन्यपूर्ण योजना तसेच मागेल त्याला शेततळे यासारख्या योजना मोठ्या प्रमाणावर राबवाव्यात. जिल्ह्यातील लागवडी योग्य क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी पतपुरवठा वेळेत मिळावा, एक रुपयात पीक विमा या योजनेपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत.
ते पुढे म्हणाले की, खतांचा गैरवापर रोखण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. कोकण विभागात आंबा, काजू, भात या पिकांसह इतर पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित न्याय मिळवून देऊ, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी असलेल्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांना प्राधान्य द्यावे. त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. नाचणी, नागली व वरई या तृणधान्याचे उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा. नॅनो युरियाच्या वापरावर भर द्यावा. सेंद्रीय शेती व कमीत कमी खत वापरणारे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक पिकांची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर द्यावा, असे सांगून श्री. सामंत यांनी कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची माहिती घ्यावी व त्याप्रमाणे कामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना आवश्यक तो लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यात 2023-24 या वर्षात एकूण 6 हजार हेक्टर क्षेत्रासाठी माती नमुना तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे रासायनिक खतांचा वापर कमी करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. या वर्षात 1 हजार 785 हेक्टर (300 मेट्रिक टन) युनिया डीएपी ब्रिकेटस्, नॅनो युनिया-500 हेक्टर (1 हजार लिटर) असे नियोजन करण्यात आले आहे. या खरीप हंगामात कर्ज वाटप लक्षांक 51 हजार 996 शेतकरी लाभार्थी असून त्यांना 38 हजार 101 लाख रुपये कर्ज वाटप लक्षांक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा व्यवस्थितरित्या केला जाईल, शेतकऱ्यांपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विविध शेती योजना पोहोचतील यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही ते शेवटी म्हणाले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे खरीप हंगाम सन 2023 च्या नियोजनाची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते व बियाणांचे पुरवठा करण्यात येईल. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर दोन व प्रत्येक तालुक्यामध्ये एक याप्रमाणे एकूण 17 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. कृषी निविष्ठा पुरवठ्याबाबत तक्रार निवारण कक्ष जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी (मोबाईल क्रमांक 9503175934) व कृषी विकास अधिकारी मिलिंद चौधरी (मोबाईल क्रमांक 8983511359) या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्थापित करण्यात आला आहे. या वर्षात 1 हजार 785 हेक्टर (300 मेट्रिक टन) युनिया डीएपी ब्रिकेटस्, नॅनो युनिया-500 हेक्टर (1 हजार लिटर) असे नियोजन करण्यात आले आहे. या खरीप हंगामात कर्ज वाटप लक्षांक 51 हजार 996 लाभार्थी असून त्यांना 38 हजार 101 लाख कर्ज वाटप लक्षांक आहे. सन 2022-23 मध्ये झालेली धान खरेदी 5 लाख 70 हजार 404 क्विंटल झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
रासायनिक खतांचा वापर कमी करण्याबाबत कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून, श्रीमती बाणखेले यांनी विविध शेती योजनांविषयी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या समन्वयातून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सोशल मीडियाच्या विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. यात बीड येथील सुहास पालीमकर या शिक्षकाने कृषी योजनांविषयी जनजागृतीपर काढलेल्या सकारात्मक व्यंगचित्रांचे विशेष सहकार्य लाभले, त्यास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, असे सांगितले.
या बैठकीचे सूत्रसंचालन उपविभागीय कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी मानले.
असे आहे खरीप हंगामाचे नियोजन
भात पिकासाठी 98 हजार 36 हेक्टर क्षेत्रावर नियोजन
भात पिकासाठी 3 हजार 176 किलोग्रॅम/हेक्टर उत्पादनाचे लक्ष
नाचणी पिकासाठी 3 हजार 37 हेक्टर क्षेत्रावर नियोजन
नाचणी पिकासाठी 1 हजार 322 किलोग्रॅम/हेक्टर उत्पादनाचे लक्ष
भात पिकासाठी 17 हजार 450 क्विंटल बियाणांची गरज
नागली पिकासाठी 150 क्विंटल बियाणांची गरज
तूर पिकासाठी 850 क्विंटल बियाणांची गरज
मूग पिकासाठी 55 क्विंटल बियाणांची गरज
भाजीपाला व इतर पिकासाठी 175 क्विंटल बियाणांची गरज,
उडीद पिकासाठी 90 क्विंटल बियाणांची गरज,
या हंगामासाठी एकूण 19 हजार 400 क्विंटल बियाणांची गरज
दि.10 मे अखेर भात बियाणांचा पुरवठा 8 हजार 945 क्विंटल
खतांचे आवंटन 17 हजार 460 मेट्रिक टन असून आतापर्यंतचा पुरवठा 1 हजार 160 मे.टन
जिल्ह्यात विविध योजनेतील पीक प्रात्यक्षिके एकूण 55 हजार 408
जिल्ह्यात 2023-24 या वर्षात एकूण 6 हजार हेक्टर क्षेत्रासाठी माती नमुना तपासणीचे नियोजन