ऐन गणेशोत्सवात खारपाडा टोलनाका होणार सुरू

। रसायनी । वार्ताहर ।

बारा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील विघ्न अद्याप कायम आहेत, असे असताना ठेकेदाराने गणेशोत्सवापूर्वी खारपाडा येथील टोलनाका सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्तांवर टोल पडण्याची शक्यता आहे.

महामार्ग अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचला असून साईडपट्ट्याही उखडल्या आहेत. पुलांची स्थिती बिकट असतानाही पेण तालुक्यातील खारपाडा येथे असणार्‍या महामार्गावरील पहिला टोलनाका सुरू करण्यात येणार आहे. या टोलनाक्यामुळे खारपाडा, आपटा परिसरातील नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

पळस्पे ते वडखळदरम्यान रस्ता चांगल्या प्रकारे तयार झाल्यामुळे खारपाडा येथील असणारा टोल सुरू करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आधी खड्डेमुक्त मार्ग बनवा, मगच टोल वसूल करा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. येत्या काही दिवसांत महामार्गावरील वर्दळ वाढणार असून चाकरमान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचा डाव आखला जात आहे. खारपाडा पुलाजवळ टोलनाका उभारण्याचे कामही वेगात सुरू झाले असून येत्या काही दिवसांत तो टोल सुरू करण्यात येणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्येही नाराजी आहे.

Exit mobile version