| मुंबई | प्रतिनिधि |
महाराष्ट्र राज्य सरकारकडून कॅरम, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, स्नूकर व बिलियर्डस्, घोडेस्वारी, गोल्फ व यॉटिंग या सात खेळांना शिवछत्रपती व अन्य पुरस्कारपात्र क्रीडा यादीतून वगळण्यात आले. सुधारित नियमावली 29 डिसेंबरला जाहीर करण्यात आली; मात्र या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारवर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली. आता महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाकडून दुसर्या श्रेणीतील खेळांना खाशाबा जाधव क्रीडा पुरस्कार देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली.
खाशाबा जाधव यांनी 1952 मधील हेलसिंकी ऑलिंपिकमधील कुस्ती या खेळात ब्राँझपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यांच्या नावाने क्रीडा पुरस्कार देण्यास सुरुवात केल्यास त्यांना मानवंदना दिली गेल्याची भावना निर्माण होईल असे सांगण्यात आले. सुधीर मोरे पुढे म्हणाले, काही खेळांच्या संघटकांकडून आमच्या खेळाडूंनाही पुरस्कार मिळायला हवा अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रीडा विभागाकडून या मागणीचा विचार करण्यात येत आहे. सध्या तरी खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस, म्हणजेच 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. खाशाबा जाधव यांच्या नावाने क्रीडा पुरस्कार देण्याची चर्चा सध्या प्राथमिक स्तरावर आहे.
हे खेळ असण्याची शक्यता कॅरम, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, स्नूकर व बिलियर्डस्, घोडेस्वारी, गोल्फ व यॉटिंग या खेळांना शिवछत्रपती व अन्य पुरस्कारपात्र क्रीडा यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या सातही खेळांचा समावेश दुसर्या श्रेणीतील खेळांमध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच सॉफ्ट बॉल (पुरुष), शूटिंग बॉल, बेस बॉल (महिला) या खेळांनाही प्राधान्य देण्यात येईल.पुरस्काराचा दर्जा लौकिकास असणार. खाशाबा जाधव क्रीडा पुरस्कार सुरू करण्यात आल्यास शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराप्रमाणेच त्याचा दर्जा असेल का, असा प्रश्न करण्यात आल्यानंतर सुधीर मोरे, दोन्ही पुरस्कारांचा दर्जा एकसारखाच असणार आहे यात शंका नाही. खेळाडूंना मिळणार्या सन्मानात कोणताही फरक करण्यात येणार नाही. दरम्यान, दोन्ही पुरस्कारप्राप्त खेळाडूंना एकसारखीच रक्कम देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दर्जा सुधारण्यासाठी निर्णय सुधीर मोरे या वेळी म्हणाले, केंद्र सरकारकडून देण्यात येणार्या अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठीही अटी आहेत. शिवछत्रपती पुरस्कारासाठीही यामुळे काही पावले उचलण्यात आली आहेत. शिवछत्रपती पुरस्काराचा दर्जा सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच घोडेस्वारी, गोल्फ या खेळांतील खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये पदक जिंकल्यास थेट पुरस्कार देण्यात येणार आहेत.