खेड हळूहळू सावरतोय ; पूरग्रस्तांना आता आस मदतीची

। खेड । प्रतिनिधी ।
गेल्या आठवड्यात जगबुडी आणि नारिंगी नदीला आलेल्या पुरामुळे उध्वस्त झालेले खेड शहर आता हळूहळू सावरू लागले आहे. मात्र, पूरात सर्वच वाहून गेलेल्या नागरिकांना आता शासकीय मदतीची आहे. विमा कंपन्यांनीही विमा देताना जास्त आढेवेढे न घेता व्यापार्‍यांना लवकरात लवकर विम्याची रक्कम देणे गरजेचे आहे. नुकसानीचे पंचनामे करतानाही योग्य प्रकारे झाले तर पुरामुळे उध्वस्त झालेला व्यापारी पुन्हा उभा राहणार आहे.
2005 साली झालेल्या अतिवृष्टीतदरम्यान खेड शहराची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. व्यापार्‍यांची दुकानच्या दुकाने वाहून गेली होती. त्यावेळी विमा कंपन्यांनी केलेल्या सहकार्यामुळे व्यापार्‍यांना पुन्हा उभे राहणे शक्य झाले होते. आता 16 वर्षाने पुन्हा पूरामुळे मोठी हानी झाली आहे. गेल्या आठवड्यात जगबुडी आणि नारिंगी या दोन नद्यांना आलेल्या पूराने खेड शहराचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने शहरात मनुष्यहानी झाली नाही. आता पुराचे पाणी ओसरले आहे. रस्त्यावर, दुकानात झालेला चिखल, गाळ काढण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरु झाले आहे. तसेच पुरग्रस्तांसाठीच्या मदतीचा ओघही सुरु झाला आहे. ठिकठिकाणाहून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी सामाजिक संस्था, मंडळ , राजकीय पक्ष खेडमध्ये येत आहेत.
2005 च्या नैसर्गिक आपत्तीनंतर शहरातील अनेक व्यापार्‍यांनी आपल्या दुकानातील मालाचा विमा उतरवला होता. त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी विमा कंपन्यांचे साहाय्य मिळेल. पण ज्या छोट्या व्यावसायिकांनी विमा उतरवलेला नाही त्यांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. हे छोटे व्यावसायिक पूर्णपणे शासकीय मदतीवर अवलंबून असल्याने तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

Exit mobile version