खेडची आर्थिक उलाढाल ठप्प

एसटी संपाचा फटका
। खेड । प्रतिनिधी ।
राज्यपरिवहन महामंडळाच्या विविध संघटनांनी सुरू ठेवलेल्या संपामुळे खेड बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. बाजारपेठेत मंदी निर्माण झाली असून, शहरातील रस्तेदेखील वर्दळविना मोकळा श्‍वास घेत आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर तब्बल दोन वर्ष लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट निर्माण झाले होते. महापुरात संपूर्ण व्यापारी आर्थिक व दुकानातील नुकसान झालेल्या मालामुळे उद्वस्त झाला. यातून काही कालावधीनंतर खेड सावरले. मात्र, आता नव्या मंदीचे संकट उभे राहिले आहे.
गेल्या पंधरा दिवसाहून अधिक काळ एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी संप सुरू ठेवल्यामुळे ग्रामीण भागातील लोक खरेदीसाठी शहरात फिरकत नाहीत. काही गरजेच्यावेळी वडापच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनता शहरात येते. मात्र, वडाप करणार्‍यांकडून अशा प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे.
परिणामी, शहरात येणार्‍या ग्राहकांवर मर्यादा आली आहे. एकीकडे एसटीचा संप सुरू असल्यामुळे अंतर्गत व ग्रामीण भागातून ग्राहक शहराकडे येण्यास उत्सुक दिसत नाही. संपाचे परिणाम शहरातील सर्वच सेवा व व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठ मंदीच्या लाटेत गुरफटली आहे. व्यापारी दिवसभर ग्राहकांची वाट पाहत आहेत. त्यामुळे आर्थिक उलाढालही ठप्प झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसांत खेड मधील आर्थिक उलाढालीचा अंदाज घेतला असता, संपामुळे सुमारे कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. सर्वचजण एसटीचा संप मिटण्याची अपेक्षा आणि आशा बाळगून आहेत. महामंडळातील विविध संघटनांमधील कर्मचार्‍यांकडून अद्यापही माघार घेण्यात आलेली नाही. शासनही याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने या संपाचा परिणाम सर्वच घटकांवर होऊ लागला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होऊ लागले आहे. ग्रामीण भागातून रोजच्या कमाईसाठी शहरात येणार्‍या कष्टकरी समाजालाही संपाचा मोठा फटका बसला आहे.

Exit mobile version