महावितरणचा खेळखंडोबा

नागरिकांची मोहोपाडा कार्यालयावर धडक

| रसायनी | वार्ताहर |

मे महिन्यातच विजेचा लपंडाव सुरु राहिल्याने रसायनी परिसरातील वीज ग्राहकांत नाराजीचा सूर उमटला आहे. परिसरात कुठे ना कुठे दररोज वीज वारंवार खंडित होत असल्याने या रणरणत्या उन्हात अंगाची लाही लाही होत असल्याने वीज ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत. अखेर शुक्रवारी (दि. 24) दुपारी सरपंच उमा मुंढे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी मोहोपाडा येथील महावितरण कार्यालयावर धडकले. त्यांनी उपअभियंता यांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण विचारुन निवेदन दिले.

मोहोपाडा परिसरात वस्ती वाढत असल्याने ट्रान्सफॉर्मरवर लोड येत आहे. शिवाय, मोहोपाडा मुख्य बाजारपेठ ते डोंगरीपर्यंत व्होल्टेज 150 पेक्षा कमीच राहात असल्याने नागरिकांच्या विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे. मोहोपाडा येथील वीजप्रवाहाचे लोखंडी पोल जमिनीपासून खराब झाल्याने पावसाळ्यात कधीही कोसळून मोठा अपघात होऊ शकतो. ग्राहकांना भरमसाठ वीजबिल आकारणी, रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होणे, दिवसाआड वीजपुरवठा खंडित करुन ग्राहकांची कुचंबणा केली जात असल्याने रसायनीतील सर्वपक्षीयांत महावितरणाविरोधात नाराजीचा सूर उमटला आहे.

Exit mobile version