खो-खो खेळाने दिली वांझोळे गावाला नवी राष्ट्रीय ओळख!

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोकणच्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये विविध प्रकारच्या क्षमता दडलेल्या असतात. या ओळखून त्यांना योग्य वयात अचूक मार्गदर्शन मिळाले तर कोकणचे हिरे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपले नाव उंचावू शकतात, हे सिद्ध करून दाखवले आहे संगमेश्‍वर तालुक्यातील वांझोळे सनगलेवाडी या गावाने. गावामधील शाळेत बदली होऊन आलेल्या प्राथमिक शिक्षकाने मुलांना खो खोचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि काही वर्षांतच खो खो खेळासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू दिले. शिक्षक सदानंद आग्रे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ही किमया करून दाखवली आहे. सनगलेवाडीतील प्रत्येक मूल खो खो खेळात तरबेज झालेय. या वाडीने गावाला खो खोचे गाव अशी ओळख प्राप्त करून दिली आहे. मुलांच्या जोडीने मुलीही या खेळात पारंगत झाल्या असून यावेळच्या जिह्याच्या खो खो संघात वांझोळे सनगलेवाडीतील सात खेळाडूंचा असणारा समावेश ही तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे तालुक्याचे सभापती जयसिंग माने यांनी सांगितले. संगमेश्‍वर-कोल्हापूर मार्गावर देवरुखपासून काही अंतरावर वांझोळे हे गाव आहे. याच गावातील सनगलेवाडीत काही वर्षांपूर्वी जाण्यासाठी रस्ताही नव्हता. अशा दुर्गम भागातील शाळेत प्राथमिक शिक्षक सदानंद आग्रे हे बदली होऊन आले आणि त्यांनी एका विशिष्ट ध्यासाने गावाला नवी ओळख देण्याचा प्रयत्न सुरू केला. सदानंद आग्रे यांना खो खो खेळाची विशेष आवड असल्याने त्यांनी शाळेतील मुलांना खो खोचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे दोन महिने मुलांना खो खो म्हणजे काय आणि त्याची नियमावली कशी असते हे सांगण्यातच गेले. या खेळाचे महत्त्व पटल्यानंतर वाडीतील प्रत्येक स्त्री-पुरुष या उपक्रमात तन मन धन अर्पून सहभागी झाला. दररोज सकाळी आणि सायंकाळी घेतल्या जाणार्‍या खो खो सरावातून मुले शालेय, केंद्र, तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर यश मिळवू लागली. आपल्या वाडीतील मुलांना खो खो खेळात मिळणारे यश पाहून ग्रामस्थही उत्साहित झाले आणि हळूहळू सर्व सनगलेवाडी खो खोमय झाली.

जिल्हास्तरावर खो खो खेळात मिळणार्‍या यशामुळे जिल्हा खो खो संघात सनगलेवाडीतील मुलांची निवड झाली. या मुलांनी राज्यस्तरावर खेळून यश प्राप्त केल्याने त्यांचा समावेश राष्ट्रीय स्तरावरील संघात झाला. खो खोचे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि पंच समीर काबदुले हेही सनगलेवाडीमधील मुलांना प्रशिक्षण देतात. शहर आणि ग्रामीण भाग यामध्ये मार्गदर्शन देताना येणार्‍या अडथळ्यांवर मात करत समीर काबदुले मुलांना खो खोचे धडे गिरवण्यात मदत करत आहेत. नुकतेच या गावात खो खोचे जिल्हास्तरीय सराव शिबीर संपन्न झाले. यावेळी सभापती जयसिंग माने, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, शिक्षणाधिकारी त्रिभुवने, राष्ट्रीय पंच समीर काबदुले, शिक्षक सदानंद आग्रे, पोलीस पाटील दिलीप सनगले आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version