। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेच्या पाठिशी उभे राहतील याची मला खात्री आहे. पदवीधर मतदारसंघातील आमचे उमेदवार अनिल परब यांचा विजय आता उघड आहे. उद्यापासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. महायुतीच्या खोके सरकारचे हे निरोपाचे अधिवेशन आहे. उद्या माध्यमांशी बोलताना राजकीय विषयाबाबत भूमिका मांडेन, अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी महायुती सरकावर टीका केली. निवडणूक असल्यामुळे राजकीय विषयावर भाष्य करणार नाही, असे सांगतानाच उद्यापासून सुरू होणार्या अधिवेशनात राजकीय भाष्य करेन, असेही त्यांनी जाहिर केले.
उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज सरकारतर्फे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र विरोधकांनी परंपरेनुसार चहापानावर बहिष्कार घातला. शेतकर्यांचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचारासारख्या विषयांवर सरकार गंभीर नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे.