खोपोलीकर वाहतूक कोंडीने हैराण

रस्ता रुंदीकरणानंतर समस्या सुटेल; प्रशासनाचा दावा

| खोपोली । प्रतिनिधी ।

येथील शहरातील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शीळफाटा शासकीय विश्रामगृह ते इंदिरा गांधी चौक, खोपोली मुख्य बाजारपेठेदरम्यान प्रवास करणार्‍यांना त्याचा फटका बसत आहे. शीळफाटा येथील रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर कोंडी कमी होईल, असा दावा खोपोली पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

शहरातील मुख्य रस्त्यालगत उभी करण्यात येणारी खासगी वाहने व बस स्थानकातील एसटी बसची वर्दळ हे वाहतूक कोंडीचे मुख्य कारण आहे. त्यामुळे बसस्थानक रहदारीपासून दूर शहराबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे. कोंडी फोडण्यासाठी रस्ता रुंदीकरण व उड्डाणपुलाची निर्मिती हे दोनच पर्याय असल्याने या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सर्व जोर धरत आहे.

खोपोली शहरातील विविध व्यापारी संकुलात वाहनतळाची सुविधा नाही. बाजारपेठ व इतर महत्त्वाच्या रस्त्यांवर हातगाड्या व फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. खासगी वाहने व मालवाहतूक करणारी मोठी वाहने ही मुख्य रस्त्यावर बिनधास्त उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीसह पादचार्‍यांनाही अडचणी येतात. खोपोली पोलिसांकडून नियमबाह्य वाहन पार्किंगविरोधात कारवाई होत असली, तरी अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले व हातगाडी चालकांविरोधात नगरपालिका किंवा पोलिसांकडून प्रभावीपणे ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

व्यापारी संकुले व बहुमजली रहिवासी इमारतींना बांधकाम परवाना देताना, वाहनतळ निर्मितीची अट खोपोलीत पाळली जात नाही. त्यामुळे अनेक वाहने बिनदिक्कत रस्त्यालगत उभी केली जातात. खोपोलीत अनेक संकुलांच्या मंजूर आराखड्यात वाहनतळाचे नियोजन करण्यात आले आहे, मात्र काही विकसकांनी वाहनतळांचे रूपांतर व्यापारी गाळ्यात केल्याचे दिसून येत आहे. याबाबत नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आक्षेप घेतल्यानंतर प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. नगरपालिका क्षेत्रात वाहनांची संख्या वाढल्याने रस्ते वाहनांच्या पार्किंगने गिळंकृत केले आहेत.

बाजारपेठेत कायम वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. कोंडी फोडण्यासाठी नगरपालिकाकडून विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. बाजारपेठेजवळ पे अँड पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शीळफाटादरम्यान रस्ता रुंदीकरण काम वेगात सुरू आहे. रस्ता रुंदीकरण झाल्यावर व अतिक्रमणे काढल्यावर वाहतूक समस्या कमी होईल.

पंकज पाटील, मुख्याधिकारी, खोपोली

शहरातील वाहतूक कोंडी समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेकवेळा चर्चा झाल्या आहेत, मात्र प्रभावी उपाययोजना अंमलात आणल्या जात नाहीत. एकतर्फी वाहतूक व गर्दीच्या वेळी मालवाहतूक करणार्‍या अवजड वाहनांना मनाई करण्याबाबत कठोर अंमलबजावणी होत नाही.

कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष, खोपोली

टोईंग वाहनाद्वारे नियमबाह्य वाहन पार्किंगवर दंडात्मक कारवाई केली जाते. शीळफाटा येथील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर दिला जात असून काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.

शीतल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खोपोल
Exit mobile version