| अलिबाग | प्रतिनिधी |
खोपोलीच्या समृद्धी कांबळे हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट निवड चाचणी सराव सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. पुणे येथे नुकत्याच झालेल्या पी.एन. सुरतवाला स्मृतीचषक एकदिवसीय 50 षटकांच्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत क्लिक-फ्लिक क्रिकेट क्लब खोपोली संघातून खेळताना समृद्धीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होते.
क्लिक-फ्लिक क्रिकेट क्लब खोपोली संघाचे प्रशिक्षक रोहित कार्ले यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी प्रशिक्षण घेत आहे. पी.एन सुरतवाला स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत समृद्धीने उत्तम फलंदाजी केली होती. सांगली जिल्ह्याच्या संघाविरुद्ध खेळताना तिने 83 चेंडूंचा सामना करत 11 चौकरांच्या सहाय्याने 73 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. संपूर्ण स्पर्धेत समृद्धीने केलेल्या उत्तम क्रिकेट खेळाच्या प्रदर्शनामुळे तिची आगामी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडचाचणीच्या सराव सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. रायगड प्रीमियर लिग आयोजित मुलींच्या क्रिकेट स्पर्धेतसुध्दा समृद्धीने उत्तम खेळ केला आहे.
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील क्लिक फ्लिक क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक रोहित कार्ले, निकुंज विठलानी, आदित्य दर्गे, रायगड प्रीमियर लिगच्या सर्व सदस्यांनी समृद्धीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.