नवी मुंबई रन फॉर डायबिटीज मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद;
रोटरी क्लब ऑफ पनवेल होरायझन, डायबेटीस हेल्थ फाऊंडेशन ट्रस्टचा पुढाकार
| पनवेल | वार्ताहर |
रोटरी क्लब ऑफ पनवेल होरायझन आणि डायबेटीस हेल्थ फाऊंडेशन ट्रस्टसोबत रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल होरायझनच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. समाजात मधुमेहाविषयी जागरूकता आणि मधुमेह व्यवस्थापनात व्यायामाचे महत्त्व वाढवण्यासाठी ‘नवी मुंबई रन फॉर डायबिटीज-2022’ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी नवीन पनवेल येथील डी मार्टसमोरील मैदानात आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्थानिक आमदारांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. तर, विजेत्यांना जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व पनवेल महानगपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

मधुमेह आणि त्याच्या संभाव्य गुंतागुंतांमुळे होणारी विकृती आणि मृत्यूची पातळी प्रचंड आहे, आणि यामुळे कुटुंब आणि समाज या दोघांवरही आरोग्य सेवेचा महत्त्वपूर्ण भार पडतो. याअनुषंगाने रोटरी क्लब ऑफ पनवेल होरायझन आणि डायबेटीस हेल्थ फाऊंडेशन ट्रस्ट सोबत रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल होरायझन यांच्यावतीने मधुमेहाने त्रस्त आणि उपचार घेऊ शकत नसलेल्या गरजू आणि गरीब लोकांसाठी इन्सुलिन बँक संकल्पना आखलेली आहे. या इन्सुलिन बँकेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रेशनिंगच्या स्वरूपात इन्सुलिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मॅरेथॉन रनच्या मधून येणार्या डोनेशन रकमेचा उपयोग डायबिटीस हेल्थ फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्टकडून इन्सुलिन बँक उभारणीसाठी केला जाणार आहे.

दोन गटात झालेल्या या मेरेथॉन स्पर्धेत सुमारे 500 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. या उपक्रमाला रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांनी हातभार लावला. मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर मॅरेथॉनमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणार्या स्पर्धकांना जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल होरायझन अध्यक्ष स्वप्नील गांधी, सेक्रेटरी विनीत परमार, खजिनदार अंकित शहा, डायबेटिस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष डॉ. गणेश हांडे, खजिनदार स्वाती हांडे, सेक्रेटरी कविता बोराडे, ट्रस्टी अमित धवडे, रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल होरायझन अध्यक्षा इशा शिंदे, रोटरी सदस्य अभिजीत सावळेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.