खोपटा-कोप्रोली रस्ता खड्ड्यात

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
| उरण | वार्ताहर |

रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खोपटा-कोप्रोली रस्त्यावर सध्या जीवघेणे खड्डे पडले असून, साईडपट्ट्यांची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग उरण व एनएचएआय यांनी रस्त्याच्या खड्ड्यांकडे लक्ष केंद्रित न केल्यास प्रवासी वाहनांना अपघात होण्याचा व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती वाहन चालक व्यक्त करीत आहेत.

उरण पूर्व विभागातील बांधपाडा (खोपटा), कोप्रोली, पिरकोन, आवरे, गोवठणे, वशेणी, पाले, मोठी जुई, कळंबुसरे, चिरनेर आदी ग्रामपंचायत हद्दीतील गावांना जोडणारा तसेच पनवेल, पेण, अलिबाग तालुक्यातील गावांना जोडणारा खोपटा-कोप्रोली हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. खोपटा-कोप्रोली-चिरनेर या सहा कि.मी. लांब रस्स्त्याच्या मजबुतीकरणासाठी स्थानिक आमदारांनी निधी मंजूर करुन तो एनएचएआयकडे वर्ग करण्यात आला. परंतु, मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 3 कोटी 75 लाखांच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी नियुक्ती केलेल्या ठेकेदारांनी उत्तम दर्जाचे डांबरीकरण व साईडपट्ट्यांचे काम न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करण्याचे काम केले. त्यामुळे काही दिवसांतच रस्त्याची दुरवस्था झाली. प्रवासी नागरिकांनी या रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात नाराजी व्यक्त केल्याने संबंधित ठेकेदारांनी मे 2022 मध्ये पुन्हा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले.

परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या डोळेझाक कारभारामुळे सध्या पावसाळ्यात रस्त्यावर मोठाले खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. तरी एनएचएआय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी सदर रस्त्याची पाहणी करुन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, नाहीतर सदर रस्त्यावर अपघात होऊन नाहक प्रवासी, वाहन चालक यांना आपला जीव गमवावा लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version