खोरा बंदरात प्रशस्त जेट्टी होणार; राज्य सरकारकडून 11.27 कोटी

‘खोरा बंदरात पर्यटकांची कसरत’ या वृत्ताची दखल
। मुरूड । वार्ताहर ।
ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना खोरा बंदरात ओहोटीच्या वेळी फेरी बोटीतून उतरताना व चढताना कसरत करावी लागत होती. नाहीतर किल्ला न पाहताच परत जावे लागत असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत होता. त्यामुळे खोरा बंदरमधील जेट्टी व्हावी, अशी मागणी सर्व स्तरावर होत होती. या वृत्ताची दखल घेत राज्य शासनाने खोरा जेट्टीच्या विस्तारासाठी 11 कोटी 27 लाखांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच खोरा बंदरातील जेट्टीचा विस्तार होणार व पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्यासाठी फेरी बोटीत चढताना व उतरताना कसरत करावी लागणार नाही.
ऐतिहासिक, अभेद्य, जगप्रसिद्ध असा मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून अनेक पर्यटक येत असतात. यामध्ये वृद्ध, अपंग, लहान मुले, स्त्रिया मोठ्या प्रमाणात असतात. तरी या खोरा जेट्टीवर ओहटीच्या वेळी पाणी कमी झाल्यानंतर पर्यटकांना बोटीमध्ये चढता-उतरताना कसरत करावी लागत होती. एखाद्या पर्यटकाचा पाय घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. हे वृत्त 1 मार्च 2022 रोजीच्या अंकात प्रसिद्ध होताच राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेत खोरा बंदरातील जेट्टीचा विस्तार करण्यासाठी व निवारा शेडसाठी 11 कोटी 27 लाखांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच सीआरझेडची परवानगी घेऊन कामाला सुरुवात करण्यात येईल, असे एमएमबीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Exit mobile version