खोराबंदर जेट्टी पूर्णत्वाच्या मार्गावर

जंजिऱ्याचा सागरी प्रवास सुखकर होणार

| मुरूड | प्रतिनिधी |

गृह व बंदर विभागाने 6 एप्रिल 2022 मध्ये खोरा बंदरातील जुन्या जेट्टीला पर्याय म्हणून नव्या प्रवासी जेट्टीची उंची व लांबी वाढवण्यासाठी 111 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच जेट्टीला आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरविण्यासाठी देखिल अतिरिक्त निधी प्रदान करण्यात आला होता.सदर जेट्टीचे काम ऑक्टोबर 2023 मध्ये सुरु करण्यात आले असून आज मितीला काम प्रगती पथावर असून ऑक्टोबर 2024 अखेर हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

खोराबंदरातून ऐतिहासिक जंजिऱ्यावर जाण्यासाठी पर्यटकांच्या सुविधेसाठी या जेट्टीचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल असा विश्वास महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या जेट्टीचे काम जोरदार सुरु असून सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस संबंधित ठेकेदाराने व्यक्त केला आहे. पूर्वी अस्तित्वात असलेल्या जुन्या जेट्टीचा वापर करताना समुद्र ओहटीच्यावेळी प्रवासी वाहतूक करणे होडी चालकांना तसेच प्रवाशांना अडचणीचे होत असे. म्हणून या नवीन कामास तातडीने निधी मंजूर करण्यात आला होता. नव्याने उभारल्या जाणाऱ्या जेट्टीचे बांधकाम सुमारे 150 मीटर पाण्याच्या आत केले जाणार असून लांबी वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ओहटीच्यावेळी प्रवासी बोटींचा खोळंबा होणार नाही आणि निर्वेधपणे किल्ल्यात जाणे सुकर होणार आहे.

सुमारे 350 वर्षापूर्वी बांधलेल्या ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर प्रतिवर्षी राजपुरी आणि खोरा बंदरातील जेट्टीवरून 6 ते 7 लाख हौशी पर्यटक हजेरी लावत असून प्रति प्रवासी मेरी टाईम बोर्डालाही लेव्ही स्वरुपात मेरीटाईम बोर्डाला पर्यटकांच्या माध्यमातून बऱ्यापैकी उत्पन्न ही मिळते. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी वाहतूक कोंडी होऊ नये व पर्यटकांना व्यस्त कार्यक्रमांतून वेळेचे नियोजन करता यावे, म्हणून दिरंगाई टाळण्यासाठी राजपुरी नवीन जेट्टी व खोरा बंदरातून पर्यटकांना किल्ल्यापर्यंत ने-आण करणे कामी जंजिरा पर्यटक वाहतुक संस्था नियुक्त करण्यात आली आहे .

Exit mobile version