वर्षभरात खुरावले-वाघोशी रस्ता खड्ड्यात

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यासाठी निधी
तब्बल अडीच कोटी रुपये पाण्यात
पाली/बेणसे | वार्ताहर |
अवघ्या एका वर्षाच्या आत सुधागड तालुक्यातील खुरावले फाटा ते वाघोशी या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अडीच कोटी रुपये निधी खर्च करून झालेल्या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यासाठी वापरलेले समान उन्मळून बाहेर पडले आहे. तर, रस्ता जागोजागी खचला आहे. यामुळे येथून प्रवास करणेदेखील जिकिरीचे झाले आहे. रस्त्याची दाणादाण उडालेली पाहून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
भेरव जिल्हा परिषदेच्या शाळेपासून दोनशे मीटरच्या अंतरापर्यंत, तर माध्यमिक विद्यालय वाघोशी ते वाघोशी गाव इथपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. भेरव अंबा नदीच्या पुलाजवळ रस्त्यावरचा डांबर व खडीचा थर पाण्यात वाहून गेला आहे. अशा अनेक ठिकठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यावरून लक्षात येते की, रस्त्याला वापरलेले मटेरियल अल्प प्रमाणात वापरून निकृष्ट प्रतीचे वापरण्यात आले असावे.
रस्त्याचे काम चालू असताना स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल आक्षेपदेखील घेतला होता. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष, संबंधित खात्याचे अभियंता यांची अनुपस्थिती व प्रशासनाची ठेकेदाराला असलेली साथ यामुळे रस्त्याच्या कामाची अशी दुरवस्था झाल्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अमित गायकवाड यांनी सांगितले. तसेच अशा ढिसाळ व निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ठेकेदारास ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी यांच्यासह स्थानिक करीत आहेत.

रस्त्याचे काम मार्च महिन्यातच पूर्णत्वास आले आहे. रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत आम्ही ठेकेदारास वारंवार सांगत आहोत. परंतु, याकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे. तरीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत व रस्ता खचला आहे, त्याठिकाणी रस्ता व्यवस्थित करण्यात येईल.
योगेंद्रकुमार मोकल, अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

भरीव निधी, पण काम निकृष्ट
खुरावले फाटा ते वाघोशी या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याला तब्बल 2 कोटी 49 लक्ष 12 हजार रुपयांचा भरीव निधी मिळाला आहे. मात्र, काम एवढे निकृष्ट झाल्याने स्थानिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

Exit mobile version