| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कौटुंबिक वादातून अपहृत झालेल्या 1 वर्ष 10 महिन्यांच्या चिमुकल्या अनम अफताब सुभेदार हिच्या शोधकार्यात ‘कृषीवल’ या वृत्तपत्राने केलेल्या पाठपुराव्यामुळे मोठी गती आली. वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाल्यानंतर, पोलीस यंत्रणेने अधिक तत्परता दाखवत दि. 20 ऑक्टोबर रोजी मुलीला सुरक्षित अवस्थेत शोधून काढले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कौटुंबिक वादातून पती अफताब नजीर सुभेदार याने दि. 12 ऑक्टोबर रोजी मुलीचे अपहरण केले होते. आई हुमैरा सुभेदार यांनी न्यायालयाच्या आदेशाने सर्च वॉरंट जारी करूनही पोलीस तपासात अपेक्षित गती येत नव्हती. या गंभीर परिस्थितीत ‘कृषीवल’ने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आणि अपहृत मुलीचा आणि आईच्या लढ्याचा सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला. या बातमीमुळे प्रशासकीय स्तरावर आणि पोलीस यंत्रणेत तपासाची गती वाढली.
मुलगी सुरक्षित सापडल्यामुळे आई हुमैरा सुभेदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हुमैरा सुभेदार यांनी यावेळी ‘कृषीवल’चे विशेष आभार मानले.
हुमैरा सुभेदार म्हणाल्या, “पोलीस यंत्रणेकडून मदत मिळत असतानाही तपासाला अपेक्षित गती नव्हती. जेव्हा ‘कृषीवल’मध्ये बातमी प्रकाशित झाली, तेव्हा वातावरण बदलले आणि तपास पथक अधिक सक्रिय झाले. कृषीवलने माझी व्यथा आणि माझ्या निरागस मुलीची गरज समाजासमोर आणली. त्यांच्या या धैर्यवान पत्रकारितेमुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे आज माझी मुलगी सुरक्षित आहे. मी कृषीवलचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते.”
या संपूर्ण कायदेशीर लढ्यात हुमैरा यांना ॲड. अजहर घट्टे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रयत्नांमुळे न्यायालयाने तत्परतेने सर्च वॉरंट जारी केला. पोलीस हवालदार लवटे यांनीदेखील या शोधकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कृषीवल, ॲड. अजहर घट्टे आणि पोलीस प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे एका लहानग्या मुलीला तिची आई आणि सुरक्षितता परत मिळाली आहे. या घटनेमुळे माध्यमे आणि कायदेशीर यंत्रणेचा समाजाला होणारा सकारात्मक परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.







