चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

| चिरनेर | प्रतिनिधी |

चिरनेर येथील नऊ वर्षांच्या मुलीचा अपहरणाचा प्रयत्न करणार्‍या आरोपीचा उरण पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या धाडसी कामगिरीबद्दल उरणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते आणि या संकटातून या मुलीला वाचविणार्‍या भरत जाधव या आदिवासी बांधवांचे सामाजिक कार्यकर्त्या अलका मोकल आणि परिसरातील महिलांनी आभार व्यक्त केले आहेत.

उरण तालुक्यातील चिरनेर गावात मंगळवारी 11 जून रोजी एका 9 वर्षांच्या मुलीच्या बाबतीत एक बाका प्रसंग ओढावला होता. मात्र, एका वाटसरू भरत जाधव या आदिवासी बांधवाने दाखवलेली सतर्कता आणि नऊ वर्षाच्या बालिकेने प्रसंगावधान राखून आरोपीच्या हातावर चावा घेऊन दाखविलेले धाडस यामुळे या नराधमाच्या हातातून सुटका झालेली ही बालिका या दुर्दैवी प्रसंगातून आपल्या घरी सुखरूप पोहोचली.

याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उरणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांनी मुलीने सांगितलेल्या आरोपीच्या वर्णनावरून तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. यात उरण पोलिसांना यश आले आहे. बामण डोंगरी पनवेल येथून स्विफ्ट गाडीतून आलेल्या राजेंद्र गोंधळी (35) याने या मुलीचा अपहरणाचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले आहे. याआधीही त्याने अशा प्रकारचा गुन्हा नवी मुंबई हद्दीत केल्याचे उघड झाले आहे. उरण पोलिसांनी शिताफीने तपास करून त्याच्या 24 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Exit mobile version