। उरण । वार्ताहर ।
चिरनेर-गव्हाणफाटा रस्त्यावर गव्हाण फाट्याजवळ एका कंटेनर वाहून नेणार्या ट्रेलरला दगड वाहून नेणार्या डंपरने धडक दिल्याने अपघात झाला.
या अपघातात डंपरचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला कामोठे येथिल एमजीएम रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला कलंडली होती.
उरण परिसरातील रस्त्यांवर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यातच या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अवजड वाहने बेकायदेशीरपणे उभी केली जातात. त्यामुळे या रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडी आणि अपघात घडत असतात. त्यात रात्रीच्या सुमारास वाहन चालक हे बेदरकारपणे वाहने चालवत असल्यामुळे येथे अपघातांची संख्या जास्त असते आणि सतत वाहतूक कोंडी होत असते. हा अपघात झाला त्यावेळेस वाहनांची संख्या कमी असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नसली तरी वाहतूक पोलिसांनी याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे अशी नागरीकांची मागणी आहे. या अपघाताची नवीन पनवेल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.