| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरातील पोस्ट कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात जेएनपीटी शॉपिंग सेंटर येथे हलविण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत होता.
आनंदनगर येथील जुन्या पोस्ट कार्यालयाची इमारत पुनर्विकासासाठी गेल्यानंतर पोस्ट कार्यालय शहराबाहेर हलविण्यात आले होते. मात्र, पोस्टाच्या विविध कामांसाठी नागरिकांना अतिरिक्त प्रवास करावा लागत असल्याने वेळ आणि पैशांचा अपव्यय होत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच पेन्शन, बचत खाते, मनीऑर्डर आणि इतर पोस्टल सेवांसाठी अवलंबून असलेल्या नागरिकांचे मोठे हाल होत होते. पोस्ट कार्यालय पुन्हा शहरात सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर या मागणीची दखल घेत आजपासून उरण शहरात नव्या ठिकाणी पोस्ट कार्यालय सुरू करण्यात आले आहे. हे कार्यालय कामठा रस्त्यावर शामियाना हॉटेल समोरील युनियन बँकेच्या वरच्या मजल्यावर सुरू करण्यात आले आहे. पोस्ट कार्यालय पुन्हा शहरात सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.






