। दिघी । वार्ताहर ।
म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात 102 व 108 च्या दोन रुग्णवाहिका आहेत. मात्र, 102 च्या रुग्णवाहिकासाठी चालक न दिल्याने गेल्या वर्षभरापासून ती विनापयोगी आहे. तर 108 च्या रुग्णवाहिकासाठी डॉक्टर नसल्याने ती असून नसल्यासारखीच आहे. यामुळे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना याचा मोठा मानसिक व आर्थिक त्रास होत आहेत.
सध्यस्थीतीत ग्रामीण रुग्णालयात 102 ची रुग्णवाहिका उभी असते. मात्र, चालक नसल्याने विना वापर पडून आहे. विशेष म्हणजे कोव्हिड रुग्णालय उद्घाटन प्रसंगी रुग्णवाहिका हस्तांतरित केली होती. तिथपासून चालक नसल्याने ती पडून आहे. याचा सर्वाधिक फटका बाहेरगावच्या रुग्णांना सोसावा लागत आहे. रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ऐनवेळी धावपळ करून स्वतःच्या पैशाने रुग्णवाहिका भाड्याने घ्याव्या लागत आहेत. यामुळे उपचारासाठी म्हसळा व श्रीवर्धन तसेच तळा तालुक्यातील आलेल्या रुग्णांना अतिरिक्त खर्चाला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने रुग्णवाहिकांची दखल घेतल्यास गरीब रुग्णांची अडचण दूर होऊ शकते.