| कोलकाता | वृत्तसंस्था |
यंदाच्या आयपीएल हंगामात अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. त्यामुळे त्यांना संपूर्ण स्पर्धेला मुकावे लागले आहे. त्यातच शनिवारी (दि.16) झालेल्या गुजरात आणि कोलकाता यांच्या सामन्यात आयपीएलमध्ये पहिल्यांदाच पदार्पण करताना मथीशा पथिरानाला गोलंदाजी करताना मैदानाबाहेर जावे लागल्याने त्याच्या दुखापतीची भीती वाढली आहे. टी-20 विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर या हंगामातील पहिला सामना खेळणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज गोलंदाजीला सुरुवात केल्यानंतर फक्त 8व्या चेंडूलाच अस्वस्थ दिसला. पथिरानाने 7 चेंडू टाकल्यानंतर 8 वा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करताना धावपट्टी सोडली. त्यानंतर त्याच्यावर मैदानातच तातडीने उपचार करण्यात आले, त्यामुळे कोलकाताचे खेळाडू आणि चाहते चिंतेत पडले. त्रास होत असतानाही पथिरानाने जिद्द दाखवत षटकाचा शेवटचा चेंडू टाकला. त्यानंतर त्याला उपचारासाठी मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले. यंदाच्या आयपीएल लिलावात कोलकाताने पथिरानाला आपल्या संघात घेण्यासाठी कोलकाताने 18 कोटी रुपये मोजले होते. कोलकाता आता प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी धडपडत असताना पथिरानाने संघात पुनरागमन केले होते आणि त्याचे संघात येणे कोलकातासाठी महत्त्वाचे मानले जात होते. मात्र, त्याच्या दुखापतीमुळे आता कोलकाताची चिंता वाढली आहे.






