१५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

पोलिसांनी केली अवघ्या 24 तासात सुटका
पनवेल । वार्ताहर ।

15 लाखांची खंडणी दे अन्यथा तुला ठार मारु’ अशी धमकी देऊन अपहरण केलेल्या इसमाची पनवेल शहर पोलिसांनी केली अवघ्या 24 तासात सुटका केली आहे. उपासना कमलकिशोर खबानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कमलकिशोर खबानी व रिझवान नावाच्या इसमाशी व्यावसायिक वाद होते. त्या वादातून रिझवान याने त्यांच्या पतीचे अपहरण केले असून, तो त्यांच्या सुटकेसाठी 15 लाख रुपये मागत आहे आणि नाही दिले तर फिर्यादीचे पती यांना ठार मारेन अशी धमकी देत असल्याचे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना सांगितले.

गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ तपास पथके स्थापन करण्यात आली. तसेच गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती मिळवून तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार त्याचा शोध घेण्यासाठी भिवंडी परिसरात पोलीस पथक रवाना करण्यात आली. नमूद पोलीस पथकाने सलग 24 तास आरोपीचा भिवंडी, भिवंडी तालुका, कल्याण, नेरळ या भागात शोध घेतला. आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा नेरळ, कर्जत, जि. रायगड येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने तात्काळ त्याठिकाणी जाऊन अपहरण झालेल्या कमलकिशोर खबानी याची आरोपी रिझवान अहमद अब्दुल गफुर शेख व इतर तीन आरोपी यांच्या ताब्यातून सुखरूप सुटका केली व सदरचा गुन्हा हा 24 तासाचे आत उघडकीस आणला.

गुन्ह्यातील अटक आरोपींची नावे रिझवान अहमद अब्दुल गफुर शेख (35) रा. भिवंडी, ठाणे, सैजाद मोहमद अन्सारी (34) रा. भिवंडी, ठाणे, वासिम अन्वर खान (37), रा. भिवंडी, ठाणे, इस्लाम उस्मान युसुफ शेख (34) रा. भिवंडी, ठाणे तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार हस्तगत करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा हा बी.के. सिंह, पोलीस आयुक्त नवी मुंबई, डॉ. जय जाधव, सह पोलीस आयुक्त, नवी मुंबई शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 02, नवी मुंबई, भागवत सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, नवी मुंबई यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार व सूचनांनुसार उघडकीस आण्यात आला. यासाठी गुन्ह्याचे तपास पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पनवेल शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक, गुन्हे संजय जोशी, सहा पोलीस निरीक्षक गणेश दळवी, पो.हवा. गंथडे, पो. हवा. वाघमारे, पो.ना. राठोड, पो.शि. मिसाळ आदींनी मेहनत घेतली.

Exit mobile version