सर्च वॉरंट असूनही तपास संथ गतीने
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कौटुंबिक वादातून पतीने आपल्या दीड वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केल्याची गंभीर घटना अलिबागमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, मुलीचा ताबा मिळावा यासाठी आईने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने सर्च वॉरंट जारी करूनही, अलिबाग पोलीस ठाण्याला अद्याप मुलीचा शोध लागलेला नाही. हा तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे. आईचे डोळे चिमुकलीकडे लागून राहिले आहेत.
हूमैरा यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, हुमैरा सुभेदार आणि तिचे पती अफताब नजीर सुभेदार यांच्यात कौटुंबिक वाद असल्याने हुमैरा आपली एक वर्ष 10 महिन्यांची लहान मुलगी अनम अफताब सुभेदार हिला घेऊन ऑगस्ट 2025 पासून तिच्या माहेरी महाड येथे राहत होती. रविवारी(दि.12) ऑक्टोबरला रात्री उशिरा अफताबने हुमैराला फोन करून मुलीची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. पतीवर विश्वास ठेवून हुमैरा दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मुलीला घेऊन अलिबाग बस स्टॅन्डवर आली. अफताबने मुलीला भेटल्यानंतर, तिच्या आजोबांना (नजीर सुभेदार) देखील तिला भेटायचे असल्याचे सांगून, तो मुलीला घेऊन गेला.
परंतु, बराच वेळ होऊनही अफताब परतला नाही. त्याचा फोनही बंद येत होता. त्यामुळे हवालदिल झालेली हुमैरा आपल्या लहान बाळाचा शोध घेण्यासाठी सासरी (तळकर नगर, अलिबाग) गेली. तेथे तिला तिचे सासरे नजीर सुभेदार भेटले. हुमैराने मुलीबद्दल विचारणा केली असता, सासऱ्यांनी ‘मुलगी इथे आलेली नाही, तू येथून निघून जा’ असे सांगून तिला हाकलून लावले.
या प्रकारानंतर हुमैरा अलिबाग पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेली. मात्र, पोलिसांनी पती-पत्नीच्या भांडणांमध्ये मुलांचा ताबा मिळवून देणे हे पोलिसांचे काम नाही, तुम्ही न्यायालयात जा, असे सांगून तिला परत पाठवले. यानंतर हुमैरा पुन्हा तळकर नगर येथे मुलीचा शोध घेण्यासाठी गेली असता, तिचा सासू (अफरोज सुभेदार), सासरे (नजीर सुभेदार), रुकसाना राजेंद्र पाटील, नणंद (अरफिया लुकमान पठाण) आणि दीर (अरफात सुभेदार) यांनी मिळून तिला प्रचंड मारहाण केली. सासू अफरोज सुभेदार व इतर सर्वांनी शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारले. रुकसाना हिने घरातून मिरची पावडर आणून हुमैराच्या अंगावर टाकली. रुकसाना हिच्या हातात पीव्हीसी पाईपचा तुकडा होता. त्यानेही हुमैराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.
या गंभीर परिस्थितीत अखेर हुमैराने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात ॲड.अजहर घट्टे यांनी हूमैरा यांना मदत केली. ते प्रकरण न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, बुधवारी (दि.15) ऑक्टोबरला अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, यांना उद्देशून सर्च वॉरंट जारी केला.
दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण अफताब सुभेदार यांनी केले असे वॉरंटमध्ये नमुद करून मुलीचा शोध घेऊन तिला तात्काळ न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने आदेश देऊनही, अलिबाग पोलीस ठाण्याला अद्याप चिमुकलीचा शोध लागलेला नाही. न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही पोलीस यंत्रणेला मुलीचा शोध घेण्यास अपयश का येत आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मुलीच्या सुरक्षिततेबाबत हुमैरा आणि तिच्या माहेरच्या लोकांमध्ये मोठी भीती आणि चिंता निर्माण झाली आहे. पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुलीचा तातडीने शोध घेतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
